वाहनक्रमांक नसलेली दुचाकी घेऊन अमली पदार्थांची विक्री   

पुणे : वाहनक्रमांक नसलेल्या दुचाकीवरून फिरून मध्यरात्रीच्या सुमारास अंमली पदार्थ विक्रीसाठी थांबलेल्या गुन्हेगाराला खडक पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून पावणे दोन लाखांच्या मेफेड्रॉनसह ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
 
कानिफनाथ विष्णु नायडु (वय ५१, काशेवाडी, भवानी पेठ) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. नायडु हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार आशिष अधिनाथ चव्हाण यांनी याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
 
खडक पोलीस ठाण्याचे पथकातील सहायक निरीक्षक अलका जाधव, उपनिरीक्षक प्रल्हाद डेंगळे, हवालदार दुडम, अंमलदार आशिष चव्हाण, काळे, शेख, नदाफ, देवकर हे गस्त घालत होेते. त्यावेळी, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास पंडीत जवाहरलाल नेहरु रस्त्याने टिंबर मार्केट येथील बाहुबली चौकात आले असता, तेथून काशेवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहनक्रमांक नसलेल्या दुचाकीवर एकजण आंधारात थांबलेला त्यांना दिसून आला. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला पकडले.
 
कानिफनाथ नायडु याची झडती घेतली असता त्याच्या खिशातील पिशव्यांमध्ये मॅफेड्रॉनची (एमडी) ८ ग्रॅम ५७ मिलीग्रॅम पावडर आढळून आली. त्याची किंमत १ लाख ७२ हजार ४०० रुपये असून पोलिसांनी एमडीसह अंमली पदार्थ विकून आलेले २५ हजार ७०० रुपये, दुचाकी व मोबाईल असा ३ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Related Articles