न्हावरे परिसरात ’पीएमपीएल’ बसच्या फेर्‍या कमी   

विद्यार्थी व प्रवाशांचे हाल

रांजणगाव गणपती, (प्रतिनिधी) :  पुणे ते न्हावरे (ता. शिरूर) या दरम्यान धावणार्‍या पीएमपीएमएल बस फेर्‍यांची संख्या प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे मोठ्या प्रमाणात कमी केल्याने स्थानिक विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि इतर प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
 
मागील दोन वर्षांपासून पुणे-वाघोली-शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे मार्गे न्हावरे येथे नियमित बस सेवा सुरू होती. दिवसभरात पुणे ते न्हावरे पाच वेळा तर शिक्रापूरवरून देखील पाच वेळा बस सेवा उपलब्ध होती. याचा लाभ न्हावरे परिसरातील उरळगाव, निर्वी, निमोणे, गुनाट, आंधळगाव, आंबळे, दहिवडी, पारोडी या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होत होता,
 
परंतु, अलीकडे प्रशासनाने एकतर्फी निर्णय घेत तब्बल ८० टक्के बस फेर्‍या बंद केल्या आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयाला जाण्यासाठी आणि नोकरदार व व्यापार्‍यांना कामासाठी पोहचण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. अनेकांना खासगी वाहनांमधून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
 
या पाश्वर्र्भूमीवर न्हावरेच्या सरपंच कमल कोकडे व ग्रामस्थांनी बस फेर्‍या पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे. बस सेवा नियमित सुरू राहणे गरजेचे आहे. प्रशासनाने अचानक निर्णय घेऊन संपूर्ण परिसराच्या दळणवळण यंत्रणेवर परिणाम केला आहे, असे कोकडे यांनी सांगितले. दरम्यान, बस फेर्‍या का कमी करण्यात आल्या याबाबत वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
 

Related Articles