कचरा निर्मूलनासाठी पेटवलेला कचरा उठला नागरिकांच्या जीवावर   

बेल्हे,(प्रतिनिधी) : बेल्हे ग्रामपंचायत प्रशासन महिलांकडून गावात साचलेल्या झाडलोट करून जमा झालेला कचरा पेटवून दिला जात आहे. पेटवलेल्या कचर्‍याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. बेल्ह्यात ग्रामपंचायत प्रशासनाकडून कचरा निर्मूलन करण्यासाठी थेट कचरा पेटवण्याचे प्रकार सुरू असल्याने प्रदूषणाची पातळी वाढली आहे. कचरा विघटन व निर्मूलनासाठी ग्रामपंचायत प्रशासन पुरेशी उपाययोजना करण्यात अपयशी ठरले. परिणामी, गावाला प्रदूषणाने विळखा घातला आहे.
 
कचराकोंडीने बेल्ह्याला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली. कचरा प्रश्नाचे पुरेपूर राजकीय भांडवल करण्यात आले. मात्र, उदासीन ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी कचरा प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले. 
 
बेल्हे गावात ठिकठिकाणी सफाई कामगार महिलांकडून साचलेला कचरा झाडलोट करून जमा केला जातो. जमा केलेला कचरा न उचलता जाग्यावरच पेटवून दिला जातो. बेल्ह्यात ठिकठिकाणी कचर्‍याला आग लावण्याचे प्रमाण वाढले असून या घातक पद्धतीने प्रशासन कचरा निर्मूलन करीत आहे. सकाळी, दुपारी, सायंकाळी गावातील बहुतेक भागात विषारी धूर पसरलेला असतो. या धुरामुळे नागरिकांना श्वसनविकार जडले आहेत. आरोग्याच्या समस्या वाढल्यानंतरही कचर्‍याला आग लावण्याचे प्रकार थांबलेले नाहीत.
 
प्रदूषण व कचर्‍याने शहराला विळखा घातला आहे. प्रदूषण नियंत्रण कायदा १९७४ नुसार कारवाई नसल्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या कचरा जाळल्यामुळे हायड्रोकार्बन आणि कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण वाढले आहे. रुग्णांना या प्रकाराचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. कार्बन मोनॉक्साईड आरोग्यासाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
 
दरम्यान बेल्हे ग्रामविकास अधिकारी किशोर वाकडे यांच्या संपर्क साधला असता तुमची सूचना योग्य आहे, झाडलोट करणार्‍या महिलांनी कचरा गोळा केल्यानंतर तो लगेच घंटागाडीत टाकला जाईल, गावात कोठेही तो जाळला जाणार नसल्याचे सांगितले.
 

Related Articles