बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधील आदिवासींचे आरे कॉलनीत पुनर्वसन करणार   

वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती

विजय चव्हाण

मुंबई : बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ३२ आदिवासी पाडे असून तेथील दोन हजार कुटुंबांचे नजीकच्याच आरे कॉलनीत पुनर्वसन करण्याची कार्यवाही सुरू आहे. केंद्रीय वनमंत्र्यांशी विचारविनिमय करून याच्या अंमलबजावणीला सुरुवात होईल, अशी महिती वनमंत्री गणेश नाईक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिली.
 
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि परिसरातील बोरिवली, गोरेगाव, पवई, भांडुप आणि मुलुंडमध्ये बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव करून अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्याबाबत सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित हेला होता.
 
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांची संख्या ५४ पर्यंत झाली आहे. हे बिबटे नजीकच्या मानवी वस्तीत शिरून हल्ले करतात. जास्त करून आदिवासी पाड्यात सोयी-सुविधा नसल्याने उघड्यावर शौचास बसणार्‍या लहान मुलांवर हल्ले होतात. हे बिबटे नॅशनल पार्कच्या बाहेर येऊ नये म्हणून पार्कच्या सभोवती भिंत बांधण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून बिबट्यांच्या संभाव्य हल्ल्यापासून बचाव होण्यासाठी आदिवासी पाड्यांनाही भिंतीचे कवच देण्याबाबत शासन विचार करीत आहे. या भिंतींच्या आतच आदिवासींना सोयी-सुविधा असतील. त्यामुळे हल्ल्याचे प्रमाण कमी होईल.
 
ते म्हणाले की, संजय गांधी उद्यानात ५४ बिबटे असून त्यांच्याकरीता ससे, हरीण यासारख्या  प्रजातीच्या प्राण्यांची संख्या पुरेशी आहे. तसेच जंगलाच्या कोअर आणि बफरमध्ये जास्तीत जास्त फळझाडे लावण्यावर भर दिला जाईल. शिवाय वानर, ससे, हरणे तेथे पोहोचतील व हिंस्त्र प्राण्यांना कोअर भागातच खाद्य मिळेल. जेणेकरून, ते नागरी वस्तीत येणार नाहीत, याकरिता पार्कमधील आदिवासी पाड्याभोवती उंच भिंत, कुंपण घालण्याचे काम प्रस्तावित आहे. तसेच, आदिवासी पाड्यांमध्येच शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचे नाईक यांनी सांगितले. 
 
आदिवासींवरील बिबट्यांचे हल्ले टळावेत म्हणून त्यांचे नजीकच्या आरे कॉलनीत ९० एकर जागेत पुनर्वसन करण्याचा विचार आहे. त्यासाठी केंद्रीय वनमंत्र्यांशी चर्चा-विचारविनिमय सुरू आहे. त्यांची संमती मिळताच म्हाडामार्फत तेथे त्यांचे पुनर्वसन करण्यात येईल. नॅशनल पार्कमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन मुलांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना प्रत्येकी २० लाखांची मदत देण्यात आली असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. या बाबत अभिजीत वंजारी, प्रवीण दरेकर, भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केले होते.

बरेचसे कर्मचारी निवृत्त

वनखात्यातील बरेचसे कर्मचारी निवृत्त झाले असून त्यांच्या जागी नवीन भरती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या जागा पूर्णपणे भरण्यात आल्या की, कर्मचार्‍यांची गस्त वाढवण्यात येईल, असेही  गणेश नाईक यांनी सांगितले.
 

Related Articles