हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका   

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका 

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात रंगलेल्या मराठी-हिंदी भाषेच्या वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एंट्री झाली आहे. संघाच्या मते देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे, आणि प्रत्येकाने आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतले पाहिजे. संघात ही बाब आधीपासून स्पष्ट आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी व्यक्त केले. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
 
हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका आहे. जर मातृभाषेतून शिक्षण हवे तर मग संघाने बंच ऑफ थॉटची होळी करावी. वन नेशन वन इलेक्शन, वन लिडर, वन लँग्वेज, वन ड्रेसकोड हे खोटे असल्याचे जाहीर करावे, असेही सपकाळ म्हणाले. पहिल्यापासून हिंदीची सक्ती हा संघाचाच अजेंडा आहे. मराठी माणसाने त्याला प्रचंड विरोध केला, म्हणून संघाने तात्पुरती माघार घेतली आहे. पण ते पुन्हा हिंदी-हिंदुत्व-हिंदूराष्ट्र हा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतील. मात्र, आम्ही तो पुन्हा हाणून पाडू असे त्यांनी स्पष्ट केले. 
 
पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्यावर हल्ला करण्याच्या घटनेचा धिक्कार करत सपकाळ म्हणाले, महात्मा गांधी यांची १९४८ साली हत्या करण्यात आली, पण आजही एका विचारधारेच्या मानगुटीवर गांधी बसलेले आहेत, त्यांना आजही गांधींची भीती वाटते. त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणार्‍याला खासदारकी दिली जाते. पुण्यात जो प्रकार घडला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाने आतापर्यंत पेरलेल्या विषवल्लीचे फळ आहे. परभणीत संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड करणार्‍याला जसे मनोरुग्ण ठरवले, तसेच पुण्यातील या शुक्ला नावाच्या माथेफिरुलाही मनोरुग्ण ठरवून टाकतील. महात्मा गांधींना संघ, भाजपाचा एवढा टोकाचा विरोध का आहे, तर त्यांनी आयडिया ऑफ इंडिया देशात रुजवली पण संघाला तर बंच ऑफ थॉटची संकल्पना रुजवायची आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. 
 

Related Articles