पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत दाखला   

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पवना नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महत्त्वाकांक्षी  प्रकल्पाचे नियोजन केले आहे. प्रकल्पास पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे.पिंपरी चिंचवड शहराच्या मध्यवर्ती भागातून पवना नदी वाहत असून तिची लांबी २४.४० किलोमीटर आहे. त्यानुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत अनुभवी तांत्रिक सल्लागार मे.एच.सी.पी. डिझाईन अ‍ॅन्ड मॅनेजमेंट प्रा.लि. यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
 
सल्लागाराने संपूर्ण पवना नदीचा सर्व्हे करून नदीच्या पाण्याचे प्रदूषण कमी करण्यासाठी व पूर नियंत्रण विषयक काम करणेसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला आहे.  पवना नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा हायड्रोलॉजी व हायड्रोलिक्स अहवाल भारत सरकारच्या सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन  मार्फत तयार करणेत आला आहे.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाकरिता पर्यावरण ना हरकत दाखला मिळण्यासाठी  महाराष्ट्र शासनास दि.१०/१२/२०१९ रोजी अर्ज करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या स्टेट एक्स्पर्ट समितीमार्फत दि. ८/०८/२०२३ रोजी मंजुरी प्राप्त झाली आहे. यानंतर सदर अर्जावर महाराष्ट्र शासनाच्या द स्टेट एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटी समिती मार्फत वेळोवेळी बैठक घेण्यात आली होती. समितीमार्फत दि.१५/०५/२०२५ रोजी बैठक आयोजित केली होती. 
 
महापालिका आयुक्त शेखर सिंह  यांनी वेळोवेळी झालेल्या बैठकीमध्ये प्रकल्पाबाबचे माहितीचे सादरीकरण केले होते. दि.७ जुलै २०२५ रोजी एस इ आय ए ए  समितीच्या बैठकीचा सभावृतांत प्रसिद्ध झाला असून त्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पवना नदीचे पुनरुज्जीवन प्रकल्पास पर्यावरण ना हरकत दाखला देण्यात आला आहे.सदर प्रकल्पाकरिता राज्य व केंद्र शासनाकडून निधी प्राप्त झालेनंतर निविदा कार्यवाही करून नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम करण्यात येणार. सदर पवना नदी पुनरुज्जीवन प्रकल्प नदी काठाचे संरक्षणासाठी, नदीकाठाची होणारी झीज टाळणेसाठी, जैव विविधता वाढीसाठी, पक्षांची घरटी, निवासस्थाने निर्माण करणेसाठी ठिकाणे, जवळचे जलाशय व नदीमध्ये जलचराचे वाढीसाठी, एकंदरीत नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवनासाठी उपयोगी ठरणार आहे. अशी माहिती पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.

Related Articles