डॉ. आंबेडकर चौकातील रखडलेल्या विकास कामांमुळे वाहतूक कोंडी   

आमदार अमित गोरखे यांनी उठवला विधान परिषदेत आवाज 

पिंपरी : येथील दापोडी ते निगडी दरम्यानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील विकासकामांमध्ये  दिरंगाई, अनियमितता आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे सांगतया  प्रश्नावर भाजप आमदार अमित गोरखे यांनी विधानपरिषदेत आवाज उठवला. गोरखे म्हणाले की, या विकासकामांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दररोज २-३ तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते, कामावर जाणार्‍यांचा मौल्यवान वेळ वाया जातो,विशेषतः मोरवाडी चौक ते चिंचवड चौकदरम्यान रस्ते अरुंद व अर्धवट अवस्थेत असल्याने गंभीर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे.
 
कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून, सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचेही पालन केले जात नाही. कार्यरत असलेल्या ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन होत असूनही, महापालिकेच्या अधिकार्‍यांकडून  ठोस कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.गोरखे यांनी विधानपरिषदेत सांगितले की, महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये लागेबांधे असल्याचा नागरिकांचा आरोप असून, त्यामुळे कामात पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव आहे. संबंधित कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि तांत्रिक ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत केली. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक मार्ग पत्करावा लागेल. असा इशारा त्यांनी दिला.

Related Articles