तुर्कस्तानला मोजावी लागली मोठी किंमत   

वृत्तवेध 

भारताच्या विरोधात गेल्याबद्दल तुर्कस्तानला मोठी किंमत मोजावी लागली आहे. भारतीय पर्यटकांच्या संतापामुळे आणि ‘सोशल मीडिया’वरील बहिष्कार मोहिमेमुळे तुर्कस्तानच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. एका अहवालानुसार मे २०२५ मध्ये तुर्कस्तानला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत २४ टक्क्यांची घट झाली आहे आणि हे सर्व फक्त एका महिन्यात घडले आहे.
 
‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान तुर्कस्तानने भारताविरुद्ध केलेले विधान आणि पाकिस्तानच्या बाजूने घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीयांना त्रास झाला. यानंतर भारतीयांनी सोशल मीडियावर ‘बॉयकॉट तुर्की’ ट्रेंड सुरू केला. त्याचा थेट परिणाम तुर्कस्तानच्या पर्यटन क्षेत्रावर झाला. दर वर्षी भारतातील लाखो पर्यटक तुर्कस्तानला भेट देतात. तेथिल इस्तंबूल, कप्पाडोसिया आणि अंताल्यासारखी ठिकाणे भारतीयांमध्ये खूप लोकप्रिय आहेत; परंतु तुर्कस्तानने भारताविरुद्ध राजकीय भूमिका घेतल्यापासून भारतीय ट्रॅव्हल एजन्सी आणि टूर ऑपरेटर्सनी तुर्कस्तान टूर पॅकेजेसच्या विक्रीत कपात करण्यास सुरुवात केली.
 
मे २०२५ मध्ये भारतीय पर्यटकांच्या संख्येत २४ टक्क्यांनी घट झाली, जी एकाच देशातून येणार्‍या पर्यटकांच्या बाबतीत तुर्कस्तानसाठी एक मोठा इशारा आहे. तुर्कस्तानमध्ये इतर प्रमुख देशांमधून येणार्‍या पर्यटकांची संख्या स्थिर राहिली किंवा थोडीशी वाढली, तर भारतातून होणारी घट बहिष्कार मोहिमेचा परिणाम स्पष्टपणे दाखवून गेली.भारत ही तुर्कस्तानसाठी एक उदयोन्मुख पर्यटन बाजारपेठ होती. भारतीय पर्यटक तेथे मोठ्या संख्येने येत होतेच; परंतु त्यांनी उच्च दर्जाच्या हॉटेल्स, शॉपिंग आणि स्थानिक मार्गदर्शक सेवांवरही बराच खर्च केला. तुर्कस्तानच्या स्थानिक अर्थव्यवस्थेला याचा थेट फायदा झाला. आता भारतीयांनी तुर्कस्तानपासून दूर राहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हे आर्थिक नुकसान अब्जावधी रुपयांमध्ये असू शकते. 
 
पर्यटन उद्योगातील तज्ज्ञांचा विश्‍वास आहे की तुर्कस्तानने आपले धोरण बदलले नाही, तर ही घसरण आणखी वाढू शकते.भारत जगातील सर्वांत मोठ्या प्रवासी बाजारपेठांपैकी एक आहे. एकदा तिथून नकारात्मक संकेत गेला की त्याचा परिणाम केवळ पर्यटनापुरता मर्यादित राहत नाही. तो व्यवसाय, राजनय आणि गुंतवणुकीपर्यंत पसरू शकतो. भारताप्रती दाखवलेल्या शत्रुत्वाची आर्थिक किंमत आता तुर्कस्तानला चुकवावी लागत आहे.

Related Articles