वाचक लिहितात   

व्यसनमुक्‍ती अभियान केवळ फार्स
 
भारतात होणार्‍या एकूण मृत्यूपैकी ९.५ टक्के मृत्यू हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होतात. महाराष्ट्रात ४२ टक्के पुरुष तर १९ टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात. यातही धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थी, तरुण यांचे प्रमाण यात जास्त असून आठव्या वर्षापासून मुले तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात अशी माहिती समोर आली आहे. मद्यसेवनाच्या आहारी गेल्यामुळे दररोज ३३६ मृत्यू होतात, तसेच ४० टक्के रस्ते अपघात केवळ मद्यसेवनामुळे होतात. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमागे देखील मद्यसेवन हाच प्रमुख घटक आहे. व्यसनाधीनतेमुळे कुटुंबाची कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. तथापि एकीकडे व्यसनमुक्ती प्रबोधन कार्यक्रम सरकारी पातळीवर तर जोरकसपणे सुरू आहे आणि दुसरीकडे तंबाखूजन्य पदार्थ तसेच मद्यविक्रीवर कोणतीही बंधने नाहीत. यामागील कारण म्हणजे अशा पदार्थांच्या विक्रीतून सरकार नामक व्यवस्थेला भरघोस महसूल मिळत असतो. त्यामुळे सरकारकडून चालविले जाणारे व्यसनमुक्ती अभियान हा केवळ फार्स ठरतो. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी घातलेली बरी. 
 
बाळकृष्ण शिंदे, पुणे
 
अस्वस्थ समाजमन
 
वाढती महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी, बालगुन्हेगारी, शेतकरी आत्महत्या, राजकीय हेव्यादाव्यांनी घसरलेली राजकारणाची पातळी यांसारख्या अनेक गोष्टींमुळे लोकांमध्ये आधीच नैराश्य आणि अस्वस्थता प्रचंड वाढली आहे. अनेक कारणांनी समाजमन अस्वस्थ झाले आहे. हुंडाबळी, महिला अत्याचाराच्या अत्यंत वेदनादायी घटना तर रोजच घडत आहेत. काही दिवसांपूर्वी धावत्या मुंबई लोकलमध्ये महिलांच्या डब्यात अगदी किरकोळ कारणामुळे दोन महिलांमध्ये संतापाचा उद्रेक होऊन दोघीही रक्तबंबाळ होईपर्यंत हाणामारी झाली. दुसर्‍या एका दुर्दैवी घटनेत सांगलीमधील आटपाडीतल्या एक शिक्षक असलेल्या जन्मदात्या बापाने केवळ बारावीच्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून पोटच्या पोरीचे आयुष्यच संपवले. क्षुल्लक कारणाने स्वतःच्या मुलीला संपवणार्‍या त्या क्रूरकर्मा बापाच्या संतापाचा इतका उद्रेक का झाला? मन सुन्न करणारी आणखी एक घटना मुंबईतून समोर आली आहे. एका निर्दयी नातवाने माणुसकीला काळिमा फासत त्याच्या कर्करोगग्रस्त आजीला मुंबईच्या आरेच्या जंगलातील कचराकुंडीत फेकल्याची घटना घडली आहे. का घडत आहेत अशा एका मागोमाग एक समाजमनाला हताश आणि निराश करणार्‍या दुर्दैवी घटना? का झाले आहे समाजमन इतके अस्वस्थ?
 
प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई   
 
संतापजनक कृत्य
 
बारावीच्या नीट परीक्षेच्या चाचणीत अपेक्षेप्रमाणे गुण मिळवले नाहीत म्हणून वडिलांनी रागाच्या भरात लाकडी खुंट्याने मुलीला मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक आणि दु:खदायक घटनेने मन खूपच व्यथित झाले. अहंकार दुखावल्यामुळे या बापाने अधिकच संतापून आपल्या लेकीला मारहाण केली! खरेच अशा निर्दयी बापांविषयी भयंकर चीड आणि संतापच येतो. तथापि या भयंकर घटनेप्रसंगी नेहमीच धावून येणारी, मायेची पाखर असणारी आई कुठे आणि काय करत होती? असा प्रश्‍न मनी आल्या वाचून राहत नाही. आपण नाही झालो, आपल्या पाल्यांनी तरी डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर व्हावे! आपण नाही शिकलो, आपल्या पाल्यांनी तरी शिकावे यासाठी भयंकर आटापिटा करणारे आणि आपल्या असफल महत्त्वाकांक्षा आपल्या पाल्यांवर निर्दयीपणे लादणार्‍या पालकांची खरेच कीव येते. आपल्या पाल्यांनी कुणीतरी उच्चपदस्थ बनावे असे वाटणे स्वाभाविक असले तरी अन्य कितीतरी क्षेत्रात आपल्याला भविष्य आजमावता येते. अगदी सामान्य क्षेत्रात सुद्धा असामान्य, उत्तुंग कामगिरी करता येते! हेही सगळे सोडा आपल्या पाल्याला उच्चपदस्थ नाही करता आले तरी, त्याला एक आदर्श ’चांगला माणूस’ बनविण्यासाठी धडपड करा ना!
 
श्रीकांत जाधव, अतीत जि.सातारा 
 
खेड्यातील महिला ‘दोडक्या’?
 
शहापूर तालुक्यातील किन्हवली परिसरातील चाफ्याची वाडी येथे खराब रस्त्यामुळे एका गर्भवतीला एक किमीपर्यंत डोलीने नेण्याची पाळी आली. हे वृत्त वाचून तळपायाची आग मस्तकात गेली. महायुतीच्या राज्यात सध्या काय चालले आहे? तेच समजत नाही. विधानसभेच्या निवडणुका जिंकायच्या होत्या त्यावेळेस ’लाडक्या बहिणी’, ’लाडक्या बहिणी’ म्हणून त्यांचा उदो उदो करण्यात आला. त्यांना दरमहा रु. १५०० देण्यात आले. त्याच जोरावर निवडणुका देखील जिंकल्या. एकीकडे या ’बहिणींचे’ फुकटचे लाड सुरू आहेत, तर दुसरीकडे खेडोपाड्यातील बहिणींच्या नशिबी मात्र कायम वनवास व दुर्दैवाचे दशावतार चालू आहेत, अशी पक्षपाती वागणूक पाहून खेड्यातील महिला सरकारच्या ’दोडक्या’ असाव्यात असे वाटते. खेडेगावात रस्ते, पाणी, वीज उपलब्ध उपलब्ध नाही. या समस्या सोडवायला प्राधान्य दिले पाहिजे. तात्पर्य सरकारचा असा अर्धवट कारभार पाहिला की,’सबका साथ सबका विकास’ याची नेमकी व्याख्या काय? हे जनतेला समजावून  सांगावे.
 
गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व), मुंबई

Related Articles