महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा   

मराठी उद्योजक म्हणजे 'जोडूनिया धन उत्तम वेव्हारे'  

समृद्धी धायगुडे 

हिंदी सक्तीच्या मुद्द्याने सध्या महाराष्ट्रात वातावरण ढवळून निघाले आहे. काही दिवसांपूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यापाराला मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली होती. या दरम्यान कालच एका प्रतिष्ठित राजकीय पक्षाच्या नेत्याने ''महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय'' असे वादग्रस्त वक्तव्य केले. या प्रकरणामुळे आरोपांच्या फैरी सध्या झाडल्या जात आहेत. महाराष्ट्रातील छोटे-मोठे मराठी उद्योजक आणि त्यांच्या यशाबाबत बरेच मुद्दे चर्चेत येत आहेत. वादग्रस्त वक्तव्य जितके बेजबाबदार आहे तितकेच मराठी उद्योजक पेटून जोमाने व्यवसाय करत आहेत. 
 
या निमित्ताने महाराष्ट्रात मुंबई आणि पुण्यात सर्वात तरुण उद्योजक आपले स्टार्टअप्स यशस्वीरित्या चालवत आहेत. या शिवाय महाराष्ट्रात उद्योग आणि व्यवसाय आजच अचानक उभे राहिलेले नाहीत. महाराष्ट्राला उद्योगांचा मोठा वारसा लाभला आहे. अगदी तुकारामांच्याच ओवीत सांगायचे तर ''जोडूनिया धन उत्तम वेव्हारे'' अशा शब्दांत मराठी व्यावसायिकांचे कौतुक करायला काहीच हरकत नसावी. संत तुकाराम यांचा देखील पूर्वीपासून हा सावकारीचा व्यवसाय होता. संत गोरा कुंभार यांचा देखील मातीच्या भांड्यांचा व्यवसायाच होता. बारा बलुतेदार या सामाजिक पद्धतीमुळे आपले पूर्वज देखील हे व्यावसायिक होतेच. 
 
कालानुरूप झालेल्या बदलांमुळे आणि ब्रिटिशांनी १५० वर्ष केलेल्या राज्यामुळे मराठी माणूस सरकारी नोकरी आणि कारकुनीकडे झुकलेला. या परिस्थितीमुळे  मराठी उद्योजक थोडा व्यवसायांपासून लांब गेला असेल, पण ९० च्या दशका नंतर हे चित्र देखील आज पर्यंत बदलत आले आहे. किंबहुना बहरत आले आहे. किती तरी मराठी उद्योजक आज आपले व्यवसाय, उत्पादने भारता बाहेर देखील पाठवत आहेत. महाराष्ट्रात आज उदाहरणे द्यायची तर सर्वांत आधी महाराष्ट्रात दादासाहेब फाळक्यांनी चित्रपट व्यवसायाला सुरुवात केली जी आज भारताची मोठी ओळख आहे. याच बरोबर तीन उद्योजक स्वतंत्र आणि स्वातंत्रपूर्व काळात उद्योगांचा पाया रचला. यामध्ये किर्लोस्कर उद्योग समूहाचे शंतनू किर्लोस्कर, श्रीपाद ओगले, वेलणकर, निळकंठ कल्याणी यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील उद्योगांचा पाया रचला. किर्लोस्कर यांनी यंत्र सामुग्री, ओगले यांनी काच कारखाना, वेलणकर यांनी कापड उद्योगाने महाराष्ट्राला औद्योगिक राज्य करण्यास सुरुवात केली. या दरम्यान काही छोटे उद्योग जे आज अतिशय यशस्वी आहेत ते उज्वल भविष्य साकारत होते जसे की, दाजी काका गाडगीळ यांचे दागिन्यांचे दुकान, चितळे उद्योग समूह, विको कंपनीच पेंढारकर, पीतांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, मंदार भारदे एमएबी एव्हिएशन, एलिफंट डिझाईन्सच्या अश्विनी देशपांडे २० वर्षांपेक्षा जास्त काळ यशस्वी रित्या व्यवसाय करत आहे.   
 
आजच्या पिढीचे बरेच व्यावसायिक म्हणजे सौरभ गाडगीळ, चितळे उद्योग समूहाचे इंद्रनील चितळे, सायली मराठे आद्या या ज्वेलरी ब्रँडची सहसंस्थापक, सागर बाबर कॉमनसेन्स टेक्नॉलॉजीचे संस्थापक आहेत.पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे, कैलास-संजय काटकर, हनुमंत गायकवाड, चंद्रकांत मोर्डे, रामदास माने, दरोडे-जोग, विठ्ठल कामत, परांजपे, 'आजोळ'च्या संचालिका मोनिका कुलकर्णी यांनी पुण्यात आपली यशस्वी उद्योगसाम्राज्ये उभारली. मराठी व्यवसायिकांपैकी 'आदिल' कंपनीचे धनंजय दातार (१५०० कोटींची उलाढाल), शंतनू देशपांडे बॉंबे शेविंग कंपनी, अमृत कंपनीचे नीलकंठ जगदाळे, कॉन्फल्युएंट कंपनीच्या नेहा नारखेडे यांच्या उद्योगांचा डंका सध्या जगात वाजत आहे. 
 
जागतिक व्यावसायिक पटलावर मराठी व्यावसायिकांची छाप आहे. यामध्ये युएईचे मसाला किंग धनंजय दातार, ७० देशांत पोहोचलेले बॉम्बे शेविंग कंपनीचे मालक शंतनू देशपांडे, नेहा नारखेडे यांची कॉन्फ्लुएंट टेक कंपनी, वीणा वर्ल्ड टुरिझम कंपनीच्या संस्थापक वीणा पाटील, अमृत ​​व्हिस्कीचे मालक निळकंठ जगदाळे आणि ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्ट्स ब्रँडच्या संस्थापक शितल आगाशे यासारख्या उद्योजकांची नावे महाराष्ट्राच्या आधुनिक उद्योगांची भक्कम पायाभरणी करत आहेत.  
 
जगातील सर्वांत श्रीमंत मराठी उद्योजक 
 
१) बाबा कल्याणी, कल्याणी ग्रुप (२.४ बिलियन डॉलरची उलाढाल)
२) आनंद देशपांडे, पर्सिस्टंट (१.३ बिलियन डॉलरची उलाढाल ) 
३) वीरेंद्र म्हैसकर, आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर (५६० मिलियन डॉलरची उलाढाल)
४) धनंजय दातार, अल अदिल ट्रेडिंग (३५० मिलियन डॉलरची उलाढाल)    
५) हनुमंत गायकवाड, बीव्हीजी ग्रुप (३०० मिलियन डॉलरची उलाढाल) 
 
या सर्व उद्योजकांच्या यशस्वी उद्योगांची पाया भरणी पासून यशाच्या शिखरापर्यंत नेण्यात मराठी माणसाची देखील तितकीच खमकी साथ लाभली आहे. या नावांबरोबर अजूनही काही नवे उदयोजक आहेत जे आपला व्यवसाय समृद्ध करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र इतरांच्या जीवावर चालतो. मराठी माणसाला व्यवसाय जमत नाही, मराठी माणसाने धंद्यात पडू नये, मराठी माणसाला नफा समजत नाही अशी सर्व विधाने करणाऱ्यांनी हे बोलण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. उद्योगाच्या वेडात सातच मराठी वीर पुढे गेले नाहीयेत तर ही संख्या दिवसेंदिवस लाखो मराठांची होत आहे. तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे मराठी माणूस कष्टाने, विचार करून आणि व्यवहार्य मार्गाने 'वेचूनिया धन उत्तम व्यवहारे' असाच आहे. याची जाणीव सर्वानीच ठेवावी.          
 

Related Articles