मीरा-भाईंदरमध्ये घुमला मराठीचा आवाज   

पोलिसांची दडपशाही झुगारत विराट मोर्चा

मुंबई : पोलिसांनी केलेल्या दडपशाहीला न जुमानता मंगळवारी मीरा-भाईंदरमध्ये मराठी भाषकांनी विराट मोर्चा काढला. परप्रांतीयांच्या अरेरावीला प्रत्युत्तर देण्यासाठी हा मोर्चा होता. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते; मात्र काल पहाटे पोलिसांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्यासह अन्य नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. नेते आणि कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचे आणि मोर्चाला परवानगी नाकारल्याचे वृत्त वार्‍याच्या वेगाने पसरले आणि तेथील मराठी भाषकांच्या संतापाचा स्फोट झाला. 
 
पोलिसांची दडपशाही झुगारुन लावत मराठी भाषक एकवटले, मुंबई-ठाणे परिसरातून मनसे, शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते येऊ लागले आणि नेते गजाआड असतानाही प्रचंड मोर्चा निघाला. संतापलेले कार्यकर्ते आणि नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चामुळे मीरा-भाईंदरमध्ये मराठी आवाज घुमला. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या गेल्या.
 
मराठी बोलण्यास नकार दिलेल्या परप्रांतीयांना मारहाण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीय व्यापार्‍यांनी मोर्चा काढला होता. त्यानंतर मराठी आणि अमराठी वाद अधिकच उफाळून आला.  त्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी कालचा मोर्चा निघाला. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने वातावरण अगोदरच तापले होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली होती. मात्र, मार्ग बदलण्यास सांगितले होते. ही बाब आंदोलकांना रुचली नाही. त्यांनी आक्रमक भूमिका घेत मोर्चा काढण्याचे ठरविले. पोलिसांच्या भूमिकेनंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतप्त झाले होते. त्यांनी आपणही मोर्चात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. ते केवळ दहा मिनिटे मोर्चात सहभागी झाले. तेथे त्यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या. पन्नास खोके एकदम ओके, गद्दार तुम्ही परत जा, अशा घोषणा देत आंदोलकांनी त्यांना परतवून लावले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी पोलिसांनी सरनाईक यांना त्या ठिकाणाहून तातडीने बाजूला नेले.मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह स्थानबद्ध करण्यात आलेल्या नेते कार्यकर्त्यांना सोडणे पोलिसांना भाग पडले. यानंतर हे सर्वजण मोर्चात सहभागी झाले. 
 

Related Articles