मालवणजवळ नौका उलटून एक मच्छीमार बेपत्ता ; दोघांना वाचवण्यात यश   

सावंतवाडी : मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक छोटी नौका जोरदार वारा आणि लाटांच्या माऱ्यात उलटली. या घटनेत नौकेतील तीन मच्छीमार समुद्रात फेकले गेले. यापैकी दोघे सुखरूप बचावले असून, एक मच्छीमार अद्याप बेपत्ता आहे. स्थानिक मच्छिमारांकडून समुद्रात त्याचा शोध सुरू आहे. ही घटना आज, मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
 
मालवण शहरातील मेढा जोशी वाडा येथील कीर्तीदा लीलाधर तारी (वय २९), सचिन सुभाष केळुसकर (वय-४२) आणि जितेश विजय वाघ (वय ३५) हे तीन मच्छीमार आज सकाळी मेढा राजकोट येथील समुद्रात छोट्या नौकेतून मासेमारीसाठी गेले होते. सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास समुद्रात अचानकपणे जोरदार वारा आणि मोठ्या लाटा उसळल्या, ज्यामुळे त्यांची मासेमारी नौका पलटी झाली.
 
या अपघातात तिन्ही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. यातील कीर्तीदा तारी आणि सचिन केळुसकर हे सुखरूपपणे किनाऱ्यावर पोहून पोहोचले. मात्र, जितेश वाघ हे समुद्राच्या पाण्यात पडून बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस निरीक्षक मारुती जगताप आणि महादेव घागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अपघातातील मासेमारी बोट किनाऱ्यावर आणण्यात आली असून, बेपत्ता जितेश विजय वाघ यांचा शोध स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने युद्ध पातळीवर सुरू आहे.
 

Related Articles