तामिळनाडूत रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या शाळेच्या बस आणि रेल्वेचा अपघात   

तीन मुलांचा मृत्यू 

कडलूर : तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात सकाळी भयंकर अपघात झाला. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत होती त्याचवेळी रुळावरून धावणाऱ्या रेल्वेची  बसला धडक बसली. या घटनेत आता पर्यंत तीन मुलांचा मृत्यू झाला. जे विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना कडलूर येथील रुग्णालयात दाखल केले. शाळेची बस रेल्वे रुळ ओलांडत होती. त्यावेळी चालकाने समोरुन येणाऱ्या रेल्वेकडे दुर्लक्ष केले आणि रुळ ओलांडला जाईल असे त्याला वाटले. पण प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या  माहितीनुसार अपघात एवढा जबरदस्त होता की, बसचे या अपघातात प्रचंड नुकसान झाले. बसमधील मुले ही फेकली गेली. या घटनेत बऱ्याच मुलांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

नेमका कसा झाला अपघात ?

आज सकाळी ७.४५ च्या सुमारास कडलूरमधील एका शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस 'रेल्वे क्रॉसिंग' फाटकाजवळ आली. हे फाटक सुरु होते. त्यामुळे बस रेल्वे येण्यापूर्वी रूळ ओलांडून पुढे जाईल असे वाटले. पण चालकाचा अंदाज पूर्ण चुकला, बस रुळांवर आली तेव्हाच समोरुन भरधाव वेगाने ट्रेन आली. या ट्रेनची बसला धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, बसचा अक्षरशः चुराडा झाला. धडक दिल्याने बस ५० मीटरपर्यंत फरपटत गेली. विद्यार्थी खाली पडले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे दाखल झाले. मदत आणि बचावकार्यही सुरु केले. जे विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांच्यावर कडलूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

मदत आणि बचावकार्य तातडीने सुरु

प्रत्यक्षदर्शींपैकी एकाने या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर या ठिकाणी पोलीस दाखल झाले. या ठिकाणी मदत आणि बचाव करणारी पथके ही पोहचली. त्यांनी तातडीने बचावकार्य सुरु केले. या घटनेत आतापर्यंत तीन  मुलांचा मृत्यू झाला. किती जणांचा मृत्यू झाला ती संख्या अधिकृतरित्या समजलेली नाही.

Related Articles