आमदार कटके यांचे नाव वगळले   

शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार

पुणे : येथील शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहारातून शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांचे नाव पोलिसांनी वगळले आहे. तसेच, निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये मालमत्ता लपवण्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमदार कटके यांच्या विरोधात जनहित अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
 
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या गैरव्यवहारात बँकेचे संचालक अनिल भोसले यांसह काही जणांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने २०२० आणि २०२१ मध्ये अटक केली होती. याच बँकेत आमदार कटके यांनी वाघोली  येथील आपली मालमत्ता गहाण ठेऊन सुमारे ९ कोटींचे कर्ज उचलले होते. तसेच, भागीदारी असलेल्या मयुरी आनंद इमारतीतील स्वत:च्या चार सदनिका  गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.पोलिसांनी कर्जबुडव्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची कारवाई केली. तथापि, आमदार कटके यांच्या मालमत्ता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात जप्त केल्या. त्यामुळे आजही आमदारांकडे त्या जागांचा ताबा आहे.      
 
हे पुणे पोलिसांनी राजकीय दबावाखाली केल्याचे अर्जात म्हटले आहे.तसेच, एका पीडित महिलेला आमदार कटके यांनी करार करून ८० लाख बँक खात्यामधून दिले होते. ते पैसेही शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतलेल्या कर्जातून फिरवले असल्याचा आरोप अर्जात केला आहे.उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना आमदार कटके यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, निवडणूक आयोगाला खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल योग्य ती कारवाई करण्याची सूचना करावी, अशी विनंती तिरोडकर यांनी अर्जात केली आहे.
 
आमदार कटके यांनी भागीदारी असलेल्या आस्थापनांसाठी तब्बल २० कोटी ९५ लाख ८५ हजारांचे कर्ज शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतल्याचे समोर आले आहे; मात्र या संदर्भात आमदार कटके यांच्यावर तसेच भागीदारी असलेल्या आस्थापनांमधील इतर सदस्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. महत्त्वाचे म्हणजे गृहप्रकल्पांमध्ये महारेराच्या कायद्याचे उल्लंघन देखील करण्यात आले आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्यावर कारवाई करण्याची विनंती केतन तिरोडकर यांनी अर्जाद्वारे उच्च न्यायालयाकडे केली आहे.
 
या आस्थापनांनी घेतलेली कर्ज पुढीलप्रमाणे
 
आर्यन डेव्हलपर्स : ८ कोटी ५४ लाख ३४ हजार रुपये
संजीत बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड : ६ कोटी ५३ लाख ८३ हजार ६०० रुपये
आर्यन असोसिएट्स : १ कोटी ५५ लाख ४९ हजार रुपये
आर्यन प्रमोटर्स अ‍ॅन्ड बिल्डर्स : ४ कोटी ३२ लाख १९ हजार
 
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित अर्ज दाखल करण्यात आल्याने शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारसंघातील हजारो मतदारांना त्यांनी उज्जैन आणि परिसरातील तीर्थस्थळांना रेल्वेने दर्शन दिले होते.

Related Articles