५२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित   

२४ तासानंतर पूर्ववत  

पुणे : महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत हिंजवडी फेज-२ मेट्रो स्थानकाजवळ रविवारी दुपारी २.१० च्या सुमारास बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या गणेशखिंड व पुणे ग्रामीण मंडळातील सुमारे ५२ हजारांहून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी दुपारपासून ठप्प झाला होता. परंतु, महावितरणने युद्धपातळीवर नियोजन करुन सोमवारी पहाटेपर्यंत सर्व लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने व टप्पा-टप्प्याने सुरळीत केल्याने नागरी भागांना दिलासा मिळाला आहे. तर काही उच्चदाब ग्राहकांना सुरु होण्यास अवधी लागणार आहे.
 
महापारेषण कंपनीने नियोजित देखभाल, दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी (दि. ६) सकाळी ११ ते दुपारी १ असा वीजपुरवठा बंद केला होता. देखभाल दुरुस्तीचे काम आटोपून वीजपुरवठा सुरु करताना रविवारी दुपारी २.१० वाजेच्या सुमारास २२० केव्ही इन्फोसिस ते २२० केव्ही पेगासस अतिउच्चदाब भूमिगत वीज वाहिनीत मोठा बिघाड झाला. परिणामी महावितरणच्या ग्राहकांना वीजपुरवठा करणार्‍या २२ केव्हीच्या २५ वाहिन्या, अतिउच्चदाबचे इन्फोसिस व नेक्सट्रा हे दोन ग्राहक अशा ९१ उच्चदाब आणि ५२ हजारांहून अधिक लघुदाब ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळित झाला होता. यामध्ये पिंपरी विभागातील २० हजार व मुळशी विभागातील ३२ हजार घरगुती व वाणिज्यिक लघुदाब ग्राहकांचा समावेश आहे.
 
रविवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत महापारेषणकडून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न चालूच होते. तोपर्यंत त्यांनी बिघाड घोषित केला नव्हता. तत्पूर्वीच महावितरणने संभाव्य वीजसंकट ध्यानात घेऊन पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर नियोजन करण्यात आले. 
 
जनमित्रांपासून मुख्य अभियंत्यांपर्यंत व देखभाल दुरुस्तीचे काम करणार्‍या एजन्सी व त्यांच्या कामगारांनी केलेल्या अथक परिश्रमामुळे महावितरणला वीजपुरवठा कमी कालावधीत सुरु करणे शक्य झाले. महावितरणचे मुख्य अभियंता सुनील काकडे, गणेशखिंड मंडलाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड व पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता युवराज जरग यांचेसह सर्व वरिष्ठ अभियंत्यानी अचूक नियोजन करुन वीजपुरवठा पर्यायी मार्गाने वळविण्यात यश मिळवत मोठ्या वीज संकटावर मात केली आहे.

Related Articles