वाघाटी १२०० रुपये किलो !   

उपवास सोडण्यासाठी ग्राहकांकडून मागणी

पुणे : आषाढी एकादशीचा उपवास दुसर्‍या दिवशी वाघाटीच्या भाजीने सोडला जातो. त्यामुळे या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी होती. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक झाली नसल्याने महात्मा फुले मंडईत शेतकर्‍यांनी विक्रीस पाठविलेल्या वाघाटीला एक किलोला तब्बल १२०० रुपये असा उच्चांकी दर मिळाला, अशी माहिती भाजी विक्रेत्यांनी दिली. आषाढी एकादशीचा उपवास सोडण्यासाठी दुसर्‍या दिवशी वाघाटीची भाजी केली जाते. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांनी वाघाटी बाजारात विक्रीस पाठविली. महात्मा फुले मंडईत एकूण मिळून १०० किलो वाघाटीची आवक झाली, अशी माहिती महात्मा फुले मंडईतील भाजीपाला व्यापारी रवींद्र खांदवे यांनी दिली.
 
आषाढी एकादशीचा  उपवास धरणारे नागरिक दुसर्‍या दिवशी वाघाटीची भाजी आणि भाकरीने उपवास सोडतात. वाघाटीची भाजी खाऊन उपवास सोडण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही आहे. दरवर्षी आषाढी एकादशीला ग्रामीण भागातील शेतकरी न चुकता बाजारात वाघाटी महात्मा फुले मंडईत विक्रीस पाठवितात. वाघाटी ठराविक भाजीपाला विक्रेत्यांकडे मिळते. पुरंदर तालुक्यातील शेतकर्‍यांनी यंदा वाघाटी विक्रीस पाठविली. मागणीच्या तुलनेत आवक कमी होत असल्याने वाघाटीला उच्चांकी भाव मिळाला. वाघाटीची भाजी नैसर्गिकरीत्या येते. सह्याद्रीच्या डोंगररांगांत वाघाटीची काटेरी झाडे असतात. शेतकरी काटेरी जाळीत असलेली वाघाटीची फळे तोडतात. वाघाटी आणि करटूल या दोन भाज्यांमध्ये फरक आहे. वाघाटाची फळे बेलफळाप्रमाणे असतात. आकाराने वाघाटीची फळे मध्यम असतात. करटूल काटेरी असते, असेही खांदवे यांनी सांगितले.

Related Articles