दुर्दम्य आशावाद हे आदिवासींचे जीवन रहस्य   

डॉ. श्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन 

पुणे : परंपरेच्या आणि अनुभवाच्या शहाणपणातून वनौषधींचे ज्ञान आदिवासी समाजाकडे आहे. त्याची जपणूक करणे आवश्यक आहे. इतर समाजात असणारी आत्महत्या आदिवासींमध्ये अभावानेच आढळते. दारिद्र्य आणि संकटे सततची असताना आदिवासी स्त्री-पुरुष चिवट आहेत. त्यांची जीवनासक्ती वंदनीय आहे. दुर्दम्य आशावाद हे आदिवासींचे जीवन रहस्य आहे. आदिवासींनी आपली ही बलस्थाने ओळखून विविध क्षेत्रात प्रगतीची भरारी मारली पाहिजे, अशी अपेक्षा ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली. 
 
आदिवासी साहित्य आणि संस्कृती संवर्धन संस्था, बल्लारपूर आणि विदिशा विचार मंच, पुणे यांच्यातर्फे आयोजित आठव्या आदिवासी उलगुलानवेध साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. सबनीस बोलत होते.संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी कृष्णकुमार गोयल, प्रा. डॉ. विनायक तुमराम, ममता क्षेमकल्याणी, साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, प्रा. विश्वास वसेकर, सुनील कुमरे उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेत हे संमेलन झाले. 
 
डॉ. सबनीस म्हणाले, मानव मुक्तीच्या समग्र परिवर्तनवादी प्रवाहात आदिवासी मुक्ती, स्त्रीमुक्ती, श्रमिक मुक्ती, दलित मुक्ती या विविध धारा आहेत. यापैकी प्रत्येक समाज घटकाला मुक्ती हवीच. त्याशिवाय समग्र मानव मुक्तीचे स्वप्न अपुरे राहील. संवादी जाणिवांच्या प्रतिभावंतांनी सर्वच उपेक्षितांच्या कल्याणासाठी आपले विविध अंगी योगदान समाजाला समर्पित करावे. त्यातच अभिजन, बहुजन, दलित आणि आदिवासींचे कल्याण आहे. आदिवासींचा स्वतंत्र साहित्य प्रवाह आज रूढ झाला आहे.  
 
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, दिवसेंदिवस जगातल्या आदिवासींची संख्या घटते आहे. त्यांच्यातले अनेक समूह त्यांच्या भाषांसकट आणि संस्कृतीसकट लुप्त होत आहेत. आदिवासी भाषा बोलणारा समाज जर आपल्या अस्मितेसह जिवंत राहिला तरच त्याची भाषा जिवंत राहील आणि संस्कृती देखील. अनेक आदिवासी समूह त्यांच्या भाषांसह आणि त्यांच्या संस्कृतीसह जगभर चाललेल्या एका विनाशकारी प्रक्रियेत नष्ट होत आहेत. आदिवासी साहित्य चळवळीचा लढा एकीकडे कालबाह्य संस्कृती विरुद्ध आणि प्रस्थापित साहित्य आणि व्यवस्थेविरुद्ध आहे त्यासाठी विद्रोह आणि आत्मशोध ही दोन मूल्ये महत्त्वाची आहेत. कृष्णकुमार गोयल, प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी मनोगत व्यक्त केले. ममता क्षेमकल्याणी यांनी प्रास्ताविक केले. नितीन जळूकर यांनी आभार मानले. उद्घाटन सोहळ्यानंतर प्रा. विश्वास वसेकर, रामराजे अत्राम, प्रा. तुलसीदास भोयर यांनी आदिवासी साहित्याचे अभिवाचन केले.  

Related Articles