जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात गैरव्यवहार   

पुणे : हवेली तालुक्यातील नांदेड ग्रामपंचातीमध्ये रस्त्यांच्या कामात झालेल्या ७५ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत विभागाने जिल्हा परिषदेकडे विचारणा केली. मात्र, याप्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालावर जिल्हा परिषदेने कारवाईच केली नसल्याची बाब समोर आली आहे. 
 
पुणे लाचलुचपत विभागाने या संदर्भात २ पत्रे जिल्हा परिषदेला पाठवली आहेत. नांदेड (ता. हवेली) येथे अंतर्गत रस्त्याचे सुमारे ७० ते ७५ लाख रुपयांचे काम होते. हे काम गाव व महापालिकेत समावेश झाल्यानंतर करण्यात आले. परंतु, त्याच बिलाचे रेकॉर्डिंग मागील तारखांना करून बिले अगोदरच अदा करण्यात आले. या कामाच्या दर्जाबाबत तक्रारी होत्या. चौकशी समितीने प्रत्यक्ष केलेल्या तपासणीमध्ये हा सिमेंट काँक्रिटचा रस्ता ५० मीटरने कमी आला. 
 
या प्रकरणी तात्कालीन उपअभियंता बाबूराव पवार आणि शाखा अभियंता शालिनी कोकाटे यांच्यात एकमेका विरोधात तक्रारी झाल्या. प्रकरण मिटविण्यासंदर्भात सबंधित कंत्राटदारांकडून घेतलेले रोख पैसे सरकारी कपाटात ठेवण्यात आले. त्याबद्दल कोकाटे यांच्यासह शाखा अभियंता सिद्धलिंग थडकर आणि पंचायत समितीमधील कनिष्ठ अभियंता आणि शाखा अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस  दिल्या होत्या. त्याचबरोबर थडकर यांच्याशी संबंधित उरुळीकांचन आणि वाघोली परिसरातील कामांची संबंधित चौकशी करण्यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रमोद माने आणि जिल्हा कृषी अधिकारी अनिल देशमुख यांची समिती नेमली होती. 
 
या समितीने संबंधितांना दोषी ठरवून तसा अहवाल देखील जिल्हा परिषदेला सादर केला होता. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी हा अहवाल राखून ठेवला. लाचलुचपत विभागाकडून त्याबाबतची माहिती मागविण्यात आल्यानंतर हा चौकशी अहवाल कुणावरही कारवाई न करता राखून ठेवल्याचे समोर आले आहे.
 
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. लाचलुचपत विभागाकडून विचारणा झाल्यानंतर प्रभारी कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी देखील बघ्याची भूमिका घेतली आहे. लाचलुचपत विभागाकडून या प्रकल्पांमध्ये जिल्हा परिषदेकडून सहकार्य होत नसल्याने आता हे प्रकरण दोषारोप पत्रांमध्ये समाविष्ट करून न्यायालयात सादर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

Related Articles