पुस्तक महोत्सवात पुण्याचा देशात दुसरा क्रमांक   

पुढील महोत्सव डिसेंबर महिन्यात 

पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या वतीने देशभर पुस्तक महोत्सव आयोजित केले जाते. याला मिळणारा प्रतिसाद आणि यशाचा विचार करता दिल्लीपाठोपाठ पुण्याचा नंबर लागतो, अशी माहिती पुण्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी दिली.याप्रसंगी पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस उपस्थित होते. आगामी पुणे पुस्तक महोत्सव १३ ते २१ डिसेंबर दरम्यान फर्ग्युसन महाविद्यालयात होईल, असेही या वेळी जाहीर करण्यात आले.
 
मलिक म्हणाले, आगामी पुस्तक महोत्सवाची थीम ‘जॉय ऑफ रिडिंग’ अर्थात वाचनाचा आनंद अशी असणार आहे. तसेच वाचन संस्कृतीला चालना देणारे उत्तम वृत्तांकन (बेस्ट कव्हरेज), उत्तम फोटो यांची नोंद घेऊन विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. शिवाय तीन हजार पुस्तक फ्री डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. दर्जेदार आणि समतोल आशय असणारी पुस्तकं या महोत्सवामध्ये असणार आहेत. पुण्यासाठी खास फिरती पुस्तक बस असेल. त्यातून आसपासच्या गावांत वाचन संस्कृतीचा प्रचार-प्रसार केला जाईल.
 
चोरीच्या, पायरेटेड पुस्तकांना बंदी
 
मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथेही पुस्तक महोत्सव आयोजित केले जाणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. सुरुवातीला मोठ्या शहरांत, त्यानंतर टप्या-टप्प्याने अगदी गावापर्यंत पुस्तक महोत्सव घेऊन जायचे आहे. हे करत असताना प्रदर्शनात चोरीच्या किंवा पायरेटेड पुस्तकांची विक्री होणार नाही, याचीही दक्षता घेतली जाणार आहे. त्यादृष्टीने एक समिती स्थापन केली जाणार आहे. शिवाय मराठी, हिंदी, इंग्रजी असे स्वतंत्र प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. पुस्तक प्रदर्शनाबरोबरच सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल, असेही राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक युवराज मलिक यांनी सांगितले.

Related Articles