शाळकरी मुलीला पळवून नेणार्‍यास अटक   

वडगावशेरी : शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करणार्‍या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अहिल्यानगरमध्ये अटक केली.अभिषेक विजय जाधव (वय-२२, सध्या रा. गणेशननगर, वडगाव शेरी, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. वडगावशेरी भागातून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी  घडली होती. मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जाधव याने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघडकीस आले.  पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगरमधून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिचे अपहरण करणारा आरोपी जाधव याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.ही कारवाई परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, उपनिरीक्षक सचिन राऊत, पोलीस कर्मचारी देवकाते यांनी केली.

Related Articles