पाकिस्तानला चीन आणि तुर्कीचा पाठिंबा नव्हता : मुनीर   

इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या संघर्षादरम्यान चीन आणि तुर्कीकडून मिळालेल्या मदतीचे दावे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सोमवारी फेटाळले. 
 
इस्लामाबादमधील नॅशनल डिफेंस युनिव्हर्सिटीच्या कार्यक्रमात बोलताना  मुनीर म्हणाले, ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताला घोषित लष्करी उद्दिष्टे साध्य करता आली नाहीत. त्यामुळे ते पाकिस्तानच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. भारतासोबतच्या संघर्षावेळी चीन पाकिस्तानला भारताच्या  हालचालींचे सर्व अपडेट देत होता. तसेच तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन आणि शस्त्रे पाठविल्याचा दावा भारताकडून करण्यात आला आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या दोन्ही देशांचा पाकिस्तानला पाठींबा नव्हता. पाकिस्तानची लष्करी ताकत ही त्याच्या धोरणात्मक क्षमतेचा परिणाम आहे, जी मागील काही दशकांमध्ये विकसित करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते राहुल सिंग?

७ ते १० मे दरम्यान झालेल्या संघर्षादरम्यान भारत प्रत्यक्षात तीन शत्रूंशी सामना करत होता. चार दिवसांच्या सशस्त्र संघर्षाचा वापर चीनने विविध शस्त्रास्त्र प्रणालींची चाचणी घेण्यासाठी प्रयोगशाळा म्हणून केला आणि दुसर्‍याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शत्रूला मारण्याच्या प्राचीन लष्करी रणनीतीनुसार इस्लामाबादला सर्वतोपरी मदत केली. तुर्की देखील इस्लामाबादला लष्करी उपकरणे पुरवून महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे सिंग यांनी म्हटले होते.
 

Related Articles