बंदुकीचा धाक दाखवून व्यापार्‍याचे अपहरण; दोघे अटकेत   

जालना : खंडणीसाठी बंदुकीचा धाक दाखवून जालन्यातील व्यापार्‍याचे अपहरण करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय रविंद्र गाडेकर व विठ्ठल भीमराव अंभोरे अशी आरोपींची नावे आहेत. जालना शहरातील भोकरदनमधील किराणा दुकानाचे मालक चंदन बसंतीलाल गोलेच्छा यांचे २९ जून रोजी पिस्तुलचा धाक दाखवून अपहरण करण्यात आले होते. यावेळी आरोपींनी गोलेच्छा यांना जीव वाचवायचा असेल तर ५० लाख रुपये खंडणीची मागणी केली होती. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडून चार लाख रुपये नेले होते. 
 
घटनेच्या दुसर्‍या दिवशी गोलेच्छा यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी शोध सुरू केला. ५ जुलै रोजी आरोपी      शहरातील विशाल कॉर्नर येथील सेवा रस्त्यावर थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. दोघांकडून १ गावठी पिस्तूल, ७७ हजार रुपये रोख, १ मोटार सायकल आणि ३ मोबाइल असा एकूण २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. आरोपींनी गुन्हा कबुल केला असून, एका फरार आरोपीचा  पोलिस शोध घेत आहेत.

Related Articles