पंजाबमध्ये व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या   

चंडीगढ : पंजाबमधील अबोहरमध्ये सोमवारी तीन दुचाकीस्वारांनी  व्यावसायिक संजय वर्मा यांची गोळ्या घालून हत्या केली. वर्मा हे ‘न्यू वेअर वेल जेंट्स टेलर’ शोरूमचे सहमालक होते. भरदिवसा भगतसिंग चौक या गजबजलेल्या व्यावसायिक क्षेत्रात वर्मा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सोमवारी सकाळी वर्मा हे आपल्या मोटारीतून भगतसिंग चौकातील शोरूमजवळ आले. मोटारीतून उतरताच दुचाकीवरून आलेल्या तीन अनोळखी हल्लेखोरांनी पळ काढला. पळून जात असताना त्यांची दुचाकी घसरली. ते काही अंतर पळून गेले आणि नंतर एका प्रवाशाकडून दुसरी दुचाकी हिसकावून तेथून त्यांनी पलायन केले.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने वर्मा यांना रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्हीची फुटेजची तपासणी करत आहेत. शहरातील सर्व प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आले आहेत आणि या प्रदेशात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.दरम्यान, या हत्येच्या निषेधार्थ अनेक व्यापारी संघटनांनी सोमवारी बाजारपेठा पूर्णपणे बंद ठेवल्या. या हत्येमागचे कारण अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. 

Related Articles