हिमाचलमध्ये पावसामुळे ७०० कोटींचे नुकसान; ३० बेपत्ता   

शिमला : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे सुमारे ७०० कोटींचे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात पावसाने राज्यात ७८ जणांचा बळी घेतला. तर, विविध घटनांमध्ये १२१ जण जखमी झाले.
 
दरम्यान, मंडी जिह्यातील मागील आठवड्यात थुनाग, गोहर आणि कारसोग उपविभागात ढगफुटी, पूर आणि दरडी कोसळण्यामुळे बेपत्ता झालेल्या ३० जणांचा अद्याप शोध सुरू आहे. ड्रोन आणि श्वान पथकाचीदेखील यासाठी मदत घेतली जात आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, भारत-तिबेट सीमा पोलिस आणि होमगार्डचे सुमारे २५० जवान प्रशासन आणि स्थानिकांसह शोध आणि बचाव कार्य राबवत आहेत. याशिवाय, २० पथके माहिती गोळा करत आहेत, तसेच दुर्गम भागात रेशन आणि वैद्यकीय किटचे वाटप 
करत आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.
 
आतापर्यंत १,५३८ रेशन किटचे वाटप करण्यात आले. तर, १२.४४ लाखांची तात्काळ मदत देण्यात आली आहे. या आपत्तीत २२५ घरे, सात दुकाने, २४३ गोठे, १४ पुलांचे मोठे नुकसान झाले. याखेरीज, ३१ वाहने वाहून गेली. तर, अनेक रस्ते खराब झाले. या आपत्तीमध्ये २१५ गुरे मृत्युमुखी पडली. तर ४९४ नागरिकांना वाचवण्यात आले आहे.
 
राज्यात २४३ रस्ते बंद आहेत. यात, १८३ रस्ते एकट्या मंडी जिल्ह्यातील आहेत. राज्यात २४१ ट्रान्सफॉर्मर जळाले असून २७८ पाणीपुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे.
 

Related Articles