ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत   

गुवाहाटी : ईशान्येकडील भागात पावसामुळे दरडी कोसळण्याच्या अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे ईशान्येकडील रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. विशेषतः त्रिपुरा, मणिपूर, मिझोराम आणि दक्षिण आसाममधील रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असल्याचे सोमवारी रेल्वेने निवेदनाद्वारे सांगितले.
 
दरडी कोसळल्याने अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. तर, काही वेळापत्रकात बदल करण्यात आला, असेही यात नमूद केले आहे. लुमडिंग विभागातील मुपा-दिहाखो स्थानकांदरम्यान दरड कोसळल्याने लुमडिंग-बदरपूरदरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी मार्गावर दगड आणि माती आली आहे. ते हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काल गुवाहाटी-सिलचर एक्स्प्रेस, रंगिया-सिलचर-रंगिया एक्स्प्रेस, गुवाहाटी-दुल्लभचेरा एक्स्प्रेस आणि सिलचर-नाहरलगुन एक्स्प्रेस रद्द करावी लागली. तर, अंशतः रद्द केलेल्या गाड्यांमध्ये सिलचर-गुवाहाटी एक्सप्रेस, सिकंदराबाद-सिलचर एक्सप्रेस आणि कोलकाता-अगरतळा एक्सप्रेस यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त सात रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक बदलावे लागले.
 

Related Articles