आसाममध्ये तीन ठिकाणी पूरस्थिती गंभीर   

गुवाहाटी : आसाममधील नद्या दुथडी भरून वाहत आहेत, त्यामुळे तीन ठिकाणी गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर देशभरातील एकूण १९ ठिकाणी नदीच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे. केंद्रीय जल आयोगाने सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. 
 
आसाममधील गोलाघाट आणि नुमालीगड आणि शिवसागर ही तीन ठिकाणे भीषण पुराचा सामना करत आहेत. एकूणच आसाममधील सात नद्यांच्या पाण्याची पातळी अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. उत्तर प्रदेशात चार ठिकाणी, बिहार आणि ओडिशामध्ये प्रत्येकी दोन ठिकाणी आणि मध्य प्रदेशात एका ठिकाणी नदीची पाण्याची पातळी सामान्य पूर परिस्थितीपेक्षा जास्त झाली आहे. देशात एकूण १९ ठिकाणी नद्यांची पाण्याची पातळी धोक्याच्या चिन्हापेक्षा जास्त आहे.
 
उत्तर प्रदेशात, घाघरा नदीने एल्गिन ब्रिज आणि अयोध्या येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे, तर गंगा नदीच्या पाण्याने फारुखाबाद आणि बदायूं येथे धोक्याची पातळी ओलांडली आहे. बिहारमधील बुधी गंडक आणि कोसी नद्यांच्या पाण्याची पातळीही वाढत असल्याचे वृत्त आहे. पुढील काही दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पूर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. भारतीय हवामान खात्याने आसाम, मेघालय आणि मणिपूरच्या काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केले आहेत. 
 

Related Articles