आई-वडील, आजी पुरात वाहून गेली; पाळण्यामुळे चिमुरडी बचावली   

सिमला : हिमाचल प्रदेशात संततधार पावसामुळे अनेक भागांत पूर, दरड कोसळणे, रस्ते खचणे आणि घरे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. मंडी जिल्ह्यात अचानक आलेल्या पुरामुळे पाण्याच्या प्रवाहात एका चिमुकलीचे आई-वडील आणि आजी वाहून गेले. मात्र, ११ महिन्यांची ही चिमुकली पाळण्यामुळे बचावली. 
 
हिमाचल प्रदेश सध्या पुराच्या तडाख्यात सापडले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले आहे. ३० जूनच्या रात्री मंडी जिल्ह्यातील सेराज विधानसभा क्षेत्राला मुसळधार पावसाने झोडपून काढले. एका घरात झोपलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. अचानक आलेल्या पुरामुळे घराच्या मागील बाजूचे बांध फुटले आणि नदीचे पाणी थेट घरात शिरले. यात त्या कुटुंबातील आई-वडील, आजी वाहून गेली; पण ११ महिन्यांची निकिता नावाची चिमुरडी बचावली. 
 
निकिता ज्या पाळण्यात झोपली होती, तो पाळणा पाण्याच्या प्रवाहाबरोबर काही वेळ वाहत गेला; पण नंतर एका कोपर्‍यात अडकून राहिला. जेव्हा बचाव पथक त्या भागात पोहोचले, तेव्हा त्या ढिगार्‍याच्या खाली निकिता पाळण्यात सुरक्षितरीत्या आढळून आली. ती थोडीशी घाबरलेली होती; पण सुखरूप होती. ती कोणत्याही प्रकारे जखमी झालेली नव्हती. निकिताचे आई-वडील रमेश आणि राधा यांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती लागले असून, आजी पूर्णादेवी यांचा शोध सुरू आहे. 
 
सध्या निकिताची काळजी तिची मावशी तारा देवी घेत आहे. तिच्या पुढील संगोपनासाठी स्थानिक प्रशासनाने सर्वतोपरी मदतीचा शब्द दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही या प्रकरणाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. निकीता उपजिल्हाधिकार्‍यांच्या कडेवर बसून हसत आणि खेळताना दिसून आली. त्या दृश्याने 
सर्वांचेच डोळे पाणावले.
 
दरम्यान, हिमाचल प्रदेशात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो नागरिक बेघर झाले असून, बचाव आणि पुनर्वसनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २० जूनपासून आलेल्या पावसाने हिमाचल प्रदेशात आतापर्यंत ७२ नागरिकांचा बळी घेतला आहे. काही जण अद्याप बेपत्ता आहेत. 
 

Related Articles