महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतोय   

भाजप खासदार निशिकांत दुबे यांची मुक्ताफळे; राज्यात संताप

मुंबई, (प्रतिनिधी) : भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचे राज्यात संतप्त पडसाद उमटले असून, क्षुद्र राजकारणासाठी राज्यात भाषिक संघर्ष घडवण्याचा कट असल्याचा आरोप शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. सर्व विषयावर बोलणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबद्दल अजून तोंड बोलत नाहीत, असा सवाल विरोधकांनी केला आहे.
 
मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील वातावरण तापले असून, उद्धव व राज ठाकरे मतभेद विसरून यासाठी एकाव्यासपीठावर आले आहेत.  यावर अन्य प्रांतातील, विशेषत ः उत्तर भारतातील वाचाळ नेत्यांनी मस्तवाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी तर राज व उद्धव यांच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर येऊन दाखवावे पटकून मारू, कुत्रा आपल्या गल्लीत वाघ असतो, अशी गरळ ओकली आहे. तसेच,  मराठी बोलावं लागेल म्हणजे काय? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अंबानी असतील. पण, त्यांचा कोणताही कारखाना महाराष्ट्रात नाही. सर्व खाणी झारखड, छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि ओडिशात आहेत. बिहार, झारखंड नसते तर टाटा आणि बिर्ला यांनी काय केले असते. तुमच्याकडे कोणते उद्योगधंदे आहेत? तुम्ही आमच्या पैशांवर जगत आहात, असे दुबे यांनी म्हटले आहे. 
 
भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांची यामुळे चांगलीच अडचण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी दुबे यांची तरसाची तुलना करताना, जाणीवपूर्वक आग लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. इकडे येऊन त्यांनी बघावे की आमचा कोणत्याही भाषेला विरोध नसून भाषेच्या सक्तीला विरोध आहे. शिवसेना व शिवसैनिक हे रक्तदान, रुग्णवाहिका सेवा यासाठी जात-पात-धर्म न बघता या गोष्टी करत आलो आहोत. हे बाहेरचे लोक इथे आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका उद्धव यांनी  केली.
 
आदित्य ठाकरे यांनीही आशिष शेलार व दुबे यांच्या या वक्तव्यांवर  संताप व्यक्त केला. आदित्य यांनी ‘एक्स’वर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे.  भाजप दररोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष या ना त्या मार्गाने ओकत आहे! काल भाजपने मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली, ‘फोडा आणि राज्य करा’ हेच यांचे धोरण आहे. भाजपच्या खासदाराने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे. या ‘थर्ड क्लास’ लोकांना भाजप बडतर्फ करणार का? हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी. पण सावध राहा, महाराष्ट्र द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे.
 
दुबे यांची धमकी भाजपचे महाराष्ट्रातील तमाम मंत्री आणि सगळ्या भाजपाईंसाठी आहे. भाजपच्या तमाम मंत्र्यांनो त्याने तुम्हालाही तुडवायची भाषा केली आहे. आता त्याच्याकडून तुडवून घ्यायचे की दुबेला तुडवायचा, हे भाजपच्या मराठी आमदार आणि खासदारांनी ठरवावे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिली. 
 
ते मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक लोक इथे येतात, काम करतात, व्यवसाय करतात, त्यावर आमचा आक्षेप नाही, असे वरुण सरदेसाई यांनी म्हटले आहे.
 
भाजपच्या माध्यमातून फूट पाडण्याचा डाव आहे हा! उत्तर भारतीयांना देखील डिवचण्याचा प्रयत्न आहे. मराठी माणसाला चिथावण्याचा भाजपचा केविलवाणा प्रयत्न आहे. इकडे आशिष शेलार हे मंत्री आहेत. पण, त्यांचे भान सुटलेले आहे. मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याचे नक्कीच उत्तर मिळेल, असेही ते म्हणाले.
 
हिंदीच्या माध्यमातून  वाद पेटवण्याचे काम होत आहे. सर्वाधिक महसूल महाराष्ट्रातून जातो. या मातीला ज्यांनी ज्यांनी स्पर्श केला त्यांचे सोने झाले. या मातीने कधीच जाती पाती, धर्मावर राजकारण केले नाही. हे सातत्याने मराठी माणसाला चिमटा काढण्याचे काम करत आहेत. 
 
महत्त्वाचे मुद्दे न काढता सर्व प्रश्न बाजूला ठेवून दिशा बदलण्याचे काम भाजप करत आहे. हा राजकीय माज आहे. ही राजकीय मुजोरी आहे. कोणी कोणाच्या पैशावर जगत नाही. महाराष्ट्राला चटके बसतील, असे बोलू नका, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. 
 
महाराष्ट्र आणि मराठीच्या पराक्रमाची साक्ष जगभर आहे. झारखंडच्या खासदाराने कायद्यात बसणारी भूमिका जरूर मांडावी. पण, मराठी माणसाच्या कर्तृत्वावर, कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये. देशाच्या विकासदरात मराठी माणसाचे योगदान काय आहे हे माहित नसेल तर आम्ही तुम्हाला त्याची माहिती पाठवू. मराठी माणूस कुणाच्या तुकड्यावर  जगत नाही. ज्यांचा महाराष्ट्राशी संबंध नाही त्यांनी मराठी माणसाच्या योगदानाबद्दल विचारू नये, असे आशीष शेलार यांनी दुबे यांना सुनावले आहे.
 

Related Articles