मुख्यमंत्र्यांकडील गृहखात्याला ‘होमवर्क’ करण्याचा सल्ला   

मुनगंटीवार यांचा सरकारला पुन्हा घरचा आहेर! 

मुंबई, (प्रतिनधी) : माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी विधानसभेत ओवायओ (ओयो) हाँटेलच्या परवानग्यांवरून सरकारवर टीकास्त्र सोडले. या हाँटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ही कशासाठी दिली जाते, हा पोलिसांच्या अभ्यासाचा विषय आहे. संस्कृती रक्षकांचे सरकार आहे, इथे जर संस्कृतीचा र्‍हास होत असेल तर गृह विभागाने ओवायओचा अभ्यास करावा, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
 
विधानसभेत गृह व इतर विभागांच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेताना मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलच्या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ओवायओ नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. शहराच्या बाहेर ही हॉटेल आहेत. या हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिकेची परावनगी घेतली जात नाही. ओयोची किती हॉटेल आहेत त्याची माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी गृह विभागाकडे केली.

मालक एफआयआर खिशात ठेवतात

कृषी खात्यावर बोलताना खताच्या वापरावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.  ते म्हणाले, एकीकडे आपण सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरवणी मागण्यात तरतूद करतो आहे. दुसरीकडे मोदी सांगत आहेत की,  शेतीतील खताची मात्रा कमी केली पाहिजे. तरीही संपूर्ण महाराष्ट्रात शेतकर्‍यांना आवश्यक खताऐवजी लिंकिंग करून महागडे खत घ्यायला लावले जात आहे. ज्यावर सरकारचे अनुदान आहे. माझ्या जिल्ह्यात कोरोमंडल कंपनीला डीएपी खत द्यायचे होते. पण, कंपनीने जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी यांनी नियमानुसार आवंटित केलेल्या खताऐवजी त्याच विक्रेत्यांना खत दिले आणि सांगितले की शेतकर्‍यांना सल्फर, नॅनो डीएपी, पीडीएम पॉटेश, १५-१५-१५ अशी महागडी खते घ्यायला लावली पाहिजेत. आम्ही एफआयआर दाखल केला. अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. पण,कंपन्यांचे मालक एवढे श्रीमंत आहेत की गुन्हा दाखल झाला तरी हा एफआयआर खिशात ठेवण्याची क्षमता त्यांची आहे म्हणून लिंकिंगच्या संदर्भात शेतकर्‍याने राज्य सरकारकडे एक जरी तक्रार केली तरी ताबडतोब अटक केली पाहिजे. अन्यथा शेतकर्‍यांची फसवणूक, शेतकर्‍यांवरील जबदरस्ती थांबवता येणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
 

Related Articles