एजबॅस्टनमधील विजय माझ्या सर्वांत चांगल्या आठवणींपैकी एक : गिल   

बर्मिंघम : एजबॅस्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताला पहिल्यांदाच कसोटी विजय मिळवून देणे, हे माझ्या सर्वात चांगल्या आठवणींपैकी एक राहील, असे मत भारताचा कर्णधार शुभमन गिल याने व्यक्त केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये गिलने म्हटले आहे.गिलच्या कर्णधारपदाची सुरुवात भारताने लीड्स येथून झाली, परंतु मालिकेतील पहिल्या सामन्यात पराभव पत्करला होता. पण भारतीय संघाने शानदार पुनरागमन करत दुसरा सामना ३३६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. कसोटी क्रिकेटमध्ये एजबॅस्टनच्या मैदानावर भारताचा हा पहिलाच विजय आहे.
 
गिल म्हणाला, ही अशी गोष्ट आहे, जी मी आयुष्यभर जपून ठेवेन. मला वाटते जेव्हा जेव्हा मी निवृत्त होईन तेव्हा ही माझ्या क्रिकेटच्या  सर्वात चांगल्या आठवणींपैकी एक असेल. मला या सामन्याचा शेवटचा झेल घ्यावा लागला आणि आम्ही हा सामना जिंकू शकलो, याबद्दल मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. अजून तीन महत्त्वाचे सामने आम्हाला खेळायचे आहेत. या सामन्यानंतर वेगाने बदल होतील. कारण आमच्याकडे आता चांगले वेगवान गोलंदाज आहे. सर्व खेळाडूंनी त्यांच्या जबाबदार्‍या चांगल्या प्रकारे पार पाडल्या. ज्या पद्धतीने सर्वांनी योगदान दिले ते खूप सकारात्मक आहे. हेच एका संघाला चॅम्पियन बनवते.
 
मला माहित आहे की कसोटी सामना जिंकणे किती कठीण आहे, विशेषतः या मैदानावर जिथे आम्ही यापूर्वी कधीही कसोटी सामना जिंकलेला नाही. मला फक्त एवढेच सांगायचे आहे की मला तुम्हा सर्वांचा अभिमान आहे, कारण सर्वांनी त्यात योगदान दिले.
 
भारतासारख्याच खेळपट्ट्या 
 
दोन कसोटी सामन्यानंतर गिल इंग्लंडमधील खेळपट्ट्यांबाबत बोलताना म्हणाला, जसे आपण भारतात खेळतो, तशाच खेळपट्ट्या येथे पहावयास मिळत आहे. बहुतेक खेळपट्ट्या फलंदाजीसाठी अनुकूल आहेत. पहिल्या दोन सामन्यांसाठी चांगल्या खेळपट्ट्या मिळाल्याने बरे वाटले. पण १० जुलैपासून लॉर्ड्सवर सुरू होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्यात खेळपट्ट्या लीड्स किंवा एजबॅस्टनसारखी सपाट नसेल. लॉर्ड्सवर कोणत्या प्रकारची विकेट आम्हाला खेळण्यास मिळते ते पाहू, त्याप्रमाणे संभाव्य संघ ठरविण्यात येईल, असे गिल याने स्पष्ट केले. 
 
ही कामगिरी कर्करोगाने ग्रस्त असलेल्या बहिणीला समर्पित : आकाश दीप
 
दुसर्‍या कसोटीतील आकाश दीपने केलेली चमकदार कामगिरी आपल्या कर्करोगग्रस्त बहिणीला समर्पित केली आहे. ’मी जेव्हा जेव्हा चेंडू हातात घेतला तेव्हा तिचे विचार माझ्या मनात येत असतात.’ असे आकाश म्हटले आहे. 
 
आकाशदीप म्हणाला, मी याबद्दल कोणाशीही बोललो नाही, परंतु दोन महिन्यांपूर्वी माझ्या बहिणीला कर्करोगाचे निदान झाले. ती माझ्या या कामगिरीमुळे खूप आनंदी होईल. यामुळे तिच्या चेहर्‍यावर हास्य येईल. मी जेव्हा जेव्हा चेंडू हातात घेतला तेव्हा तिचे विचार आणि प्रतिमा माझ्या मनात येत होती. ही कामगिरी तिला समर्पित आहे. मी तिला सांगू इच्छितो, आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत, असे सांगत आकाश दीप भावनिक झाला. 
 
सपाट खेळपट्टीमुळे कुलदीपऐवजी सुंदरला संधी
 
कुलदीप यादवसारख्या विकेट घेणार्‍या फिरकीपटूला अंतिम संघात स्थान न दिल्याने आमच्यावर अनेक टीका होत होत्या. पण एजबॅस्टन कसोटीत फलंदाजीत आणखीन मजबूत करण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला पसंती देण्यात आली. अंतिम आकरामध्ये वॉशिंग्टनचा समावेश करण्याचा वादग्रस्त निर्णय नक्कीच योग्य ठरला, कारण या अष्टपैलू खेळाडूने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. सपाट खेळपट्टीवर मजबूत फलंदाजी आवश्यक होती, असे गिलने सांगितले. 

Related Articles