लॉर्डस्वर बुमराहचा सामना करण्यासाठी चांगली तयारी करावी लागेल : मॅक्युलम   

बर्मिंगहॅम : दुसर्‍या कसोटीच्या पाचही दिवस इंग्लंडचा संघ भारतापेक्षा मागे राहिला, त्यामुळे इंग्लंडला पराभावाचा सामना करावा लागला. लॉर्डस्वरील तिसर्‍या कसोटीत जसप्रीत बुमराहच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्हाला चांगली तयारी करावी लागेल, असे मत इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी व्यक्त केले. 
 
बुमराह वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसर्‍या कसोटी सामना खेळला नाही. तरी भारताने ३३६ धावांनी सामाना जिंकून पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर भारतीय कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केले, की  पुढील सामन्यात वेगवान गोलंदाज बुमराह संघात परतेल.
 
मॅक्युलम म्हणाला, पुढील सामन्यात बुमराह परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला चांगली तयारी करावी लागेल. मला वाटते, की लॉर्डस्ची खेळपट्टी इथल्यापेक्षा वेगळी असेल, जी आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. दुसर्‍या कसोटी सामन्यात आम्ही पाचही दिवस भारतापेक्षा मागे होतो. भारताने शानदार कामगिरी केली. शुभमन गिल हा एक उत्तम फलंदाज आहे. आम्ही ज्या पद्धतीने खेळायला हवे होते तसे खेळलो नाही आणि ते विजयासाठी पूर्णपणे पात्र होते. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाठवण्याचा इंग्लंडचा निर्णय चुकीचा होता. एकूणच खेळपट्टीचाही चुकीचा अंदाज लावण्यास आमाच्याकडून चूक झाली, असे मॅक्युलमने नमूद केले. 
 
भारताने प्रत्येक विभागात इंग्लंडला हरवले : स्टोक्स
 
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत स्टोक्स म्हणाला, आकाशने खेळपट्टीवरील भेगांचा चांगला वापर केला. सतत कोन बदलण्याची आणि त्याचा वापर करण्याची त्याची क्षमता अद्भूत आहे. तो खेळपट्टीवरील भेगावर लक्ष केंद्रित करत होता.  क्रीजवर कोन बदलतानाही आकाशने ज्या पद्धतीने त्या भागात गोलंदाजी केली त्यावरून त्याचे अविश्वसनीय कौशल्य दिसून येते.  ३०० किंवा त्याहून अधिक धावांनी सामना गमावणे हा मोठा फरक आहे. भारताने खेळाच्या प्रत्येक विभागात त्यांच्यापेक्षा चांगली कामगिरी केली, असे स्टोक्सने नमूद केले.

Related Articles