दुसर्‍या कसोटीत वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाचा मालिका विजय   

सेंट जॉर्ज (ग्रेनाडा) : ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा १३३ धावांनी पराभव करून मालिका विजय मिळवत फ्रँक वॉरेल चषक आपल्याकडेच राखला आहे.ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ ३४.३ षटकांत १४३ धावांवर गुंडाळून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अजिंक्य आघाडी घेतली.ऑस्ट्रेलियाने स्टीव्ह स्मिथ (७१) आणि कॅमेरॉन ग्रीन (५२) यांच्या अर्धशतकांच्या मदतीने दुसर्‍या डावात २४३ धावा करून वेस्ट इंडिजसमोर २७७ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले. वेस्ट इंडिजकडून शमार जोसेफने ६६ धावांत चार बळी घेतले.
 
वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही, त्यांचे ३३ धावांत चार खेळाडू बाद झाले. त्यानंतर यातून वेस्ट इंडिजचा संघ सावरू शकला नाही, आणि १४३ धावांवर बाद झाला व सामना दुपारच्या सत्रातच संपला. ऑस्ट्रेलियाकडून डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने आठ षटकांत २४ धावा देत तीन बळी घेतले. जोश हेझलवूडने ५.३ षटकांत ४२ धावा देत तीन बळी घेतले. सामन्यात सहा बळी घेणारा लिऑन आता ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ग्लेन मॅकग्राची बरोबरी करण्यापासून फक्त एक बळी दूर आहे.
 
लिऑनने २०११ पासून १३९ कसोटीत ५६२ बळी घेतले आहेत. मॅकग्राने १९९३-२००७ पर्यंत १२४ कसोटीत ५६३ बळी घेतले आहेत. १९९२-२००७ पर्यंत १४५ कसोटीत ७०८ बळींसह दिग्गज लेग-स्पिनर शेन वॉर्न ऑस्ट्रेलियाच्या यादीत अव्वल स्थानावर आहे.वेस्ट इंडिजकडून कर्णधार रोस्टन चेसने दुसर्‍या डावात सर्वाधिक ३४ धावा केल्या, परंतु स्टार्कने त्याला पायचीत बाद केले. शमर जोसेफने तीन षटकारांच्या मदतीने २४ धावांचे योगदान दिले. ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने पहिल्या डावात ६३ आणि दुसर्‍या डावात ३० धावा केल्या. याशिवाय त्याने यष्टींमागे चार झेलही घेतले.तिसरा कसोटी सामना शनिवारपासून जमैकाच्या किंग्स्टन येथे सुरू होईल. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल.

Related Articles