तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगराकडे जाणार्‍या रस्त्याची दुरवस्था   

चाकण, (वार्ताहर) : संत तुकाराम महाराजांची साक्षात भूमी असलेला भामचंद्र डोंगर या तीर्थस्थानाकडे जाणार्‍या रस्त्यास जोडणारा चाकण करंजविहिरे रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली असून पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. त्यामुळे प्रवासी व भाविक त्रस्त झाले आहेत.चाकण औद्योगिक वसाहतीत पूर्णपणे रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. त्याचप्रमाणे हंट्समनचौकातून चाकण करंजविहिरे रस्त्यास बाह्य वळण देत तळेगाव औद्योगिक वसाहतीस रस्ता काँक्रीट करून जोडण्यात आला. औद्योगिक वसाहतीतील सर्व रस्ते काँक्रीटचे असताना फक्त दीड किलोमीटर अंतराचा वासुली फाटा ते पडवळवस्ती या रस्त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. 
 
रस्ता औद्योगिक वसाहतीत आहे, मात्र  रस्ता एमआयडीसीकडे येत नसल्याने त्यांनीही दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करत आहे. या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली असून पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. पीएमपीएल बस, एसटी, कंपनी कामगार यांची याच रस्त्याने सतत वाहतूक असते. तसेच भामचंद्र डोंगरावर भाविकांची येजा तर असतेच पण सुमारे तीस किलोमीटर अंतरावरून सुमारे २००० विद्यार्थी भामचंद्र विद्यालय या शाळेत शिक्षणासाठी येत असतात. या खड्डेमय रस्त्यामुळे मुलामुलींचे अपघात होऊन कित्येकदा जखमी झाले आहे.  सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक, पालक, कामगार यांनी केली आहे.

Related Articles