भीमाशंकरमध्ये व्हीआयपींच्या दर्शनामुळे भाविक हैराण   

भीमाशंकर,(वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे रोज कोणी ना कोणी खेड - आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेतेमंडळी यांचे फोन, मेसेजनुसार संबंधित नागरिकांना व्हीआयपी दर्शन द्यावे लागत आहे. या संधीचा फायदा घेत देवस्थान कर्मचारीही व्हीआयपींच्या नावाखाली घुसखोरी करून इतर भाविकांना दर्शन देत आहे. याचा दर्शनरांगेत चार ते पाच तास बोचरी थंडीमध्ये उभे असलेलें वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.    
 
देशातील व राज्यातील सर्व शासकीय खात्याचे अधिकारी त्यामध्ये महसूल विभाग, पोलीस, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, लष्करी विभाग, आयकर विभाग आदि अनेक खात्यांचे अधिकारी, कर्मचारी भीमाशंकर येथे दर्शनासाठी येतात. यासह देशातून तसेच विविध राज्यांतून खासदार, आमदार, मंत्री यांच्या भेटी, त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी दर्शनासाठी येत असतात. अशी व्हीआयपींची दर्शनासाठी प्रक्रिया दररोज चालू असते. 
 
काही राजकीय नेते पद आणि अधिकाराचा वापर करून संस्थानचे दररोजचे कामकाजात दर्शनाबाबत त्रास देतात. त्याचा परिणाम देवस्थानच्या कामकाजावर होत असून दर्शन रांग बंद करून यांना प्रथम दर्शन दिले जात आहे.व्हीआयपींच्या नावाखाली देवस्थान कर्मचारीही इतर भाविकांची घुसखोरी करून दर्शन देत असल्याने भाविक नाराजी व्यक्त करत असून श्री क्षेत्र भीमाशंकर येथे संबंधित राजकीय व्यक्ती, अधिकारी स्वतः आले तर त्यांना व्हीआयपी दर्शन द्यावे. मात्र त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी आले तर त्यांना दर्शनरांगेतूनच दर्शनाची व्यवस्था करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
 

Related Articles