गोंदीमध्ये तब्बल ३५ वर्षांनंतर एसटी   

ग्रामस्थांकडून स्वागत; विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर फुलले हसू

सातारा,(प्रतिनिधी) : रेठरे बुद्रुक व शेणोली या गावांजवळील गोंदी गावाची सुवासिक इंद्रायणी तांदळासाठी सातासमुद्रापार ओळख आहे. गावातील इंद्रायणी तांदळाचे ग्राहक राज्यासह परदेशात आहेत. मात्र, या गावाला तीन दशकांपासून एसटीच येत नव्हती. ग्रामपंचायत व युवकांच्या पाठपुराव्यातून तब्बल ३५ वर्षांनंतर गावात एसटी आल्याने गावकर्‍यांचे चेहरे हरखले.
 
रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला गोंदी हे गाव आहे. कर्‍हाडपासून १५ किलोमीटरअंतरावर हे गाव आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी कर्‍हाडयेथे दररोज ये जा करतात. त्यांना रहदारीसाठी शेणोली स्थानक व रेठरेबुद्रुक येथून जाणार्‍या मार्गाचा अवलंब करावा लागतो. शेणोली ते कृष्णा कारखाना मार्ग व रेठरे बुद्रुकपासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावात येण्यासाठी कोणतीही वाहतुकीची सुविधा नाही.
 
कर्‍हाड येथून ये-जा करण्यासाठी गावातून रेठरे बुद्रुक व शेणोली कारखाना रस्त्यापर्यंत अडीच किलोमीटर पायपीट करावी लागते. कर्‍हाड व इतरत्र जाण्यासाठी वाहतुकीची सुलभ सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपासून कर्‍हाड एसटी आगाराकडे प्रयत्न सुरू केले. यासाठी गावातील युवकांनी महामंडळातील संपर्कातून पाठपुरावा केला. आमदार डॉ. अतुल भोसले यांचेही या प्रश्नाकडे सरपंच सुबराव पवार यांनी लक्ष वेधले होते. अखेर गावात कर्‍हाड आगाराची एसटी येऊ लागली आहे. गावात ३५ वर्षांनंतर पहिल्यांदा आलेल्या एसटीचे ग्रामस्थ, महिलांनी स्वागत केले. कर्‍हाड आगारातून सुटणारी एसटी कार्वे, दुशेरे, शेरेमार्गे गोंदीमध्ये येऊ लागली आहे. सध्या सकाळी व सायंकाळच्या वेळेत तीन फेर्‍या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे गावाची तालुक्याच्या ठिकाणी रहदारी सुखकर बनली आहे.
 

Related Articles