पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सामील   

पुणे : भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आणि युवा स्टार पृथ्वी शॉ याने मुंबई क्रिकेट असोसिएशनचा निरोप घेत, आगामी हंगामापासून महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून, महाराष्ट्राच्या क्रिकेट संघाची ताकद यामुळे अधिक बळकट होणार आहे.
 
पृथ्वी शॉने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० अशा तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचप्रमाणे, आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने भरीव कामगिरी करत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ साली अंडर-१९ विश्वचषक जिंकला होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ शतके आणि ४५०० हून अधिक धावा आहेत.
 
आपल्या निर्णयाविषयी बोलताना पृथ्वी शॉ म्हणाला, कारकिर्दीतील या वळणावर मी एक क्रिकेटपटू म्हणून स्वतःची वाढ आणि विकासासाठी महाराष्ट्र संघाकडून क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून आजवर मला मिळालेल्या संधी आणि पाठिंब्याबद्दल मी पुन्हा कृतज्ञता व्यक्त करतो. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी राज्यभर विशेष प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग, वुमन्स एमपीएल, कॉर्पोरेट शील्ड, डी. बी. देवधर ट्रॉफी यांसारखे उपक्रम ही त्याची साक्ष आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे, की अशा प्रेरणादायी वातावरणात खेळल्याने माझ्या कारकिर्दीला नवे वळण मिळेल. ऋतुराज गायकवाड, अंकित बावणे, राहुल त्रिपाठी, रजनीश गुर्बानी आणि मुकेश चौधरी यांसारख्या गुणवान खेळाडूंसोबत महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळेल, याचा मला आनंद आहे.
 
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले, सर्व फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व केलेला स्टार खेळाडू पृथ्वी शॉ यांनी महाराष्ट्र संघात खेळण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत करतो. त्याचा अनुभव व आक्रमक खेळ नव्या पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शक ठरेल. पृथ्वी शॉ याला महाराष्ट्र संघात सामावून घेण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी आमच्या अपेक्स कमिटी आणि सीएसी कमिटीचे आभार मानतो. 

Related Articles