बेल्हे परिसर हिरवाईने नटला   

बेल्हे,(प्रतिनिधी) : यंदा दमदार पाऊस बरसल्याने बेल्हे परिसरातील आळे, राजुरी, बांगरवाडी, आणे, नळावणे डोंगरमाथा हिरवाईने नटला आहे. बहरलेला निसर्ग स्थानिक ट्रेकर्स, किल्ले प्रेमींना साद घालू लागला आहे.
 
कळमजाई देवी डोंगर, आळे खिंड, खबडी, बांगरवाडी आदी डोंगरमाथ्याची लांबी १७ ते १८ किलोमीटर इतकी आहे. डोंगरमाथा व परिसरात जैविक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. या भागात गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस होतो. त्यामुळे डोंगरमाथ्यावर फारसे नैसर्गिक सौंदर्य फुलत नव्हते. यावर्षी हंगामाच्या मध्याला जोरदार पाऊस झाला. त्यामुळे हा डोंगरमाथा हिरवाईने नटला. मात्र भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी परिसरात अजूनही धो धो पावसाची आवश्यकता आहे. कळमजाई व गुुुळूचंवाडी, नळावणे, कुलस्वामी डोगर वैशिष्ट्यपूर्ण आहे. तेथे सकाळी सहा वाजता गेले, तर ढगांचा स्पर्श, थंडगार हवा असा थेट महाबळेश्वरचाच अनुभव अनुभवायास मिळतो. 
 
गुळूंचवाडी परिसरातील डोंगर परिसर नुकत्याच पडलेल्या पावसाने फुलला आहे. या परिसराला पौराणिक महत्त्वही आहे.विविधतेने नटलेल्या डोंगरातील झाडे, वेलीवर पशुपक्ष्यांची किलबिल वाढली आहे. नळावणे परिसरात जंगली श्वापदे, मोर, ससा, हरीण, काळवीट, साळिंदर, लांडगे, जंगली डुकरे दिसत आहेत.या डोंगररांगेत हिरडा, बेहडा, अर्जुन, सौताडा, गुळवेल, गुंज, काळी मैना, चंदन यांसारख्या वनौषधींचा खजिना आहे. त्यामुळे तेथे धार्मिक पर्यटनालाही चालना मिळू शकते.
 

Related Articles