‘एअर इंडिया’ची सूत्रे एन. चंद्रशेखर यांच्या हाती   

वृत्तवेध

अहमदाबादमध्ये ‘एअर इंडिया’च्या विमानाला अपघात झाला, त्यानंतर टाटा समूहाच्या ‘एअर इंडिया’मध्ये पुन्हा एकदा मोठा बदल दिसून आला आहे. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी ‘एअर इंडिया’च्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी स्वीकारली आहे. ‘एअर इंडिया’चे ‘सीईओ’ आणि ‘एमडी’ कॅम्पबेल विल्सन काही काळासाठी रजेवर गेल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
 
‘एअर इंडिया’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या कंपनीची कमान एन. चंद्रशेखरन यांच्याकडेच राहील. सूत्रांचे म्हणणे आहे की चंद्रशेखरन यांनी ‘एअर इंडिया’च्या उच्च व्यवस्थापनासोबत बैठकाही सुरू केल्या आहेत आणि ते सर्व कामकाजाचे थेट निरीक्षण करत आहेत. हा निर्णय अशा वेळी आला आहे, जेव्हा ‘एअर इंडिया’ मोठ्या बदल आणि विस्ताराच्या टप्प्यातून जात आहे. जानेवारी २०२२ मध्ये ‘टाटा ग्रुप’ने कंपनीचे अधिग्रहण केले. तेव्हापासून व्यापक पुनर्रचना, नवीन विमान ऑर्डर आणि ग्राहक सेवेत सुधारणा अशी अनेक पावले उचलली गेली आहेत.
 
कॅम्पबेल विल्सन रजेवरून परत येईपर्यंत चंद्रशेखरन सूत्रे सांभाळतील. तरीही टाटा ग्रुप ‘एअर इंडिया’बद्दल किती गंभीर आणि सक्रिय आहे याचे हे उदाहरण आहे. तज्ज्ञांच्या मते, ‘एअर इंडिया’च्या परिवर्तन मोहिमेत उच्चस्तरीय देखरेख आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. चंद्रशेखरन यांचे सूत्रे हाती घेण्याचे पाऊल त्या दिशेने एक मोठा प्रयत्न मानले जाते. ‘एअर इंडिया’ला जागतिक दर्जाची विमान कंपनी बनवण्यासाठी टाटा समूह सतत काम करत असून हा नवीनतम निर्णय त्या दृष्टिकोनाचा एक भाग आहे.

Related Articles