नाशिक-मुंबई महामार्गाची तातडीने दुरुस्ती करा   

अजित पवार यांची गडकरी यांच्याकडे मागणी

मुंबई, (प्रतिनिधी) : नाशिक- मुंबई तसेच पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या दोन्ही मार्गांची अवस्था खराब झाली आहे. वाहतुकीसाठी धोकादायक ठरत असलेल्या या रस्त्यांवर अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठवून केली आहे.
 
नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील कसारा घाट, इगतपुरी परिसरातील खराब रस्त्यांची अवस्था, खराब दर्जाचे वळण आणि पुलांचे अपूर्ण काम यामुळे  वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या मार्गावरही गंभीर अपघात घडत असून, या महामार्गांची सखोल पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी विनंती पवार यांनी केली आहे. पुणे-नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून  महत्त्वाचा असून सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. वेळेचा, इंधनाचा आणि मनस्तापाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याशिवाय या महामार्गावर नियमितपणे टोल आकारला जात असतानाही रस्त्याच्या गुणवत्तेत आणि  सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा झालेली नाही, याकडे पवार यांनी लक्ष वेधले आहे. 
 

Related Articles