धरण क्षेत्रात धुव्वाधार   

१९ टीएमसी पाणीसाठा; आणखी वृष्टी होणार

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीतील चारही धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पुढील ३ ते ४ चार दिवस धरण क्षेत्रात जोरदार ते मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या सव्वा महिन्यात शहराला वर्षभर पुरेल इतके पाणी धरणांत साठले आहे. 
 
खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या चार धरणांत रविवारी सायंकाळपर्यंत १८.६३ टीएमसी पाणी साठले आहे. त्याचे प्रमाण ६४ टक्के आहे. पुणे शहराला वर्षाला सुमारे १३ ते १४ टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. गेल्या सव्वा महिन्यात धरणात सुमारे १५ टीएमसी पाणी साठले आहे. धरण क्षेत्रात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे या आठवड्यातही पाणीसाठ्यात आणखी मोठी वाढ होणार आहे, असा अंदाज पाटबंधारे विभागाने व्यक्त केला. 
 
पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरण क्षेत्रासह कोकणाच्या सीमेवरील सह्याद्रीच्या रांगांवर मुसळधार ते अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रासह घाट माथ्यावरील पाणी धरणांत वाहून येणार असल्याने पुढील चार दिवसांत धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. धरणांत १९ टीएमसी पाणी साठले असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. वर्षभर शेतीला आवश्यक असणारे पाणीही धरणांत साठत आहे. त्यामुळे पुणेकरांसह शहराच्या खालच्या भागातील शेतकर्‍यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
 
धरणांत वेगाने पाणी साठत आहे. खडकवासला धरणातून गेल्या काही दिवसांपासून मुठा नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरण ६२.१७ टक्के भरले आहे. त्यामुळे धरणात जसे पाणी साठेल, त्या प्रमाणात नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. धरणात क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असल्याने आज (सोमवारी) खडकवासला धरणातून नदीपात्रात अधिक प्रमाणात पाणी सोडण्यात येणार असल्याचा अंदाज आहे. 
 
पुणे घाट विभागात अतिवृष्टीचा इशारा
 
पुणे जिल्ह्यातील घाट विभागात काही दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे. पुढील तीन दिवस घाट विभागात अतिजोरदार ते अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे या भागासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मागील आठवड्यातही दोन दिवस पुणे जिल्ह्यातील घाट विभागात मुसळधार पाऊस पडला होता. त्यानंतरही तेथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. 
 
चार दिवस राज्यभर पाऊस 
 
समुद्रकिनार्‍यावरील द्रोणीय केंद्र दक्षिण गुजरात ते दक्षिण कर्नाटक दरम्यान आहे. कोकण, गोव्यात पुढील ५ ते ७ दिवस बहुतांश ठिकाणी, विदर्भात तीन दिवस बर्‍याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र तीन दिवस काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तीन दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. रायगडच्या घाट विभागात अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या विभागाला रेड अलर्ट, तर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट विभागासाठी ऑरेज तर विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 
 
धरण क्षेत्रातील २४ तासांतील पाऊस 
 
धरण पाऊस टीएमसी टक्केवारी
खडकवासला    ०४ मिमी १.२३ ६२.१७
पानशेत              ३९ मिमी ६.६५ ६२.४४
वरसगाव ३८ मिमी ८.७६ ६८.३६
टेमघर ११८ मिमी १.९९ ५३.७४
एकूण १९९ मिमी १८.६३ ६३.९२
मागील वर्षी               -- ५.६५ १९.४०

Related Articles