इराण-इस्रायल युद्धानंतर खामेनी पहिल्यांदाच आले नागरिकांसमोर   

तेहरान : इराण-इस्रायल संघर्षानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी प्रथमच जनतेसमोर आले. तेहरानमध्ये शनिवारी मोहरमच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमाला खामेनी हजर होते. 
 
इमाम हुसेन यांच्या शहीदत्वाची जयंती उपासकांनी साजरी केली. शिया मुस्लिमांसाठी हा एक महत्त्वाचा दिवस आहे. या कार्यक्रमाला खामेनी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात संसद अध्यक्षासह अनेक प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.  इराणी सरकारी दूरदर्शनने या कार्यक्रमाची थेट चित्रफीत प्रसारित केली. त्यामध्ये खामेनी पारंपरिक काळ्या पोशाखात कार्यक्रमस्थळी प्रवेश करताना दिसले. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित जमावाने लब्बैक या हुसैन अशा घोषणा दिल्या.
 
१९८९ पासून सत्तेत असलेले खामेनी १३ जून रोजी इस्रायलने अचानक केलेल्या हवाई हल्ल्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नव्हते. इस्रायलच्या हल्ल्याच्या दोन दिवस आधी संसद सदस्यांना ते भेटले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत तसेच नेतृत्वाबाबत अनेक तर्कवितर्क सुरू झाले होते. विरोधक आणि आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचा असा अंदाज होता की, युद्धाच्या पार्श्वभूमीवर खामेनी सुरक्षित स्थळी, कदाचित बंकरमध्ये लपले असावेत. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवण्यात आले होते. युद्धाच्या सुरुवातीच्या काळात इस्रायली हवाई हल्ले अधिक तीव्र होते, त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची होती, असे इस्रायली अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, या सार्वजनिक उपस्थितीमुळे खामेनी यांच्या आरोग्याबाबत पसरलेले संशय दूर झाले असून, इराणमध्ये नेतृत्व अजूनही सशक्त असल्याचा संदेश  जगभरात पोहोचता झाला आहे.
 

Related Articles