भिती दाखवून वारंवार पैसे उकळणार्‍या पोलिसांवर कारवाई   

पुणे : नाकाबंदीदरम्यान मोटार बॅरीकेडला धडकली आणि एक महिला पोलीस हवालदार मोटारीसोबत ५० ते ६० मीटर फरफटत गेल्याने गंभीर जखमी झाली. पोलिसांनी या वाहनचालकाला पकडले आणि त्याच्याकडूनच पैसे उकळले. हा प्रकार नायडु हॉस्पिटल लेनमध्ये एआयएसएसएमएस कॉलेज समोर वेलस्ली रोड येथे ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री एक वाजून २० मिनिटांनी घडला. त्यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. मात्र त्याने दिलेल्या जबाबात चौघा पोलिसांचा प्रताप उघडकीस आला. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नुकतीच एका  सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध कारवाई केली.
 
सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल उत्तम नेवसे (नेमणूक विशेष शाखा), पोलीस हवालदार सुहास भिमराव धाडगुडे (नेमणूक लष्कर पोलीस ठाणे), पोलीस हवालदार प्रकाश दादासो कट्टे (नेमणूक, फरासखाना पोलीस ठाणे), पोलीस अंमलदार सचिन कल्याण वाघमोडे (नेमणूक विश्रामबाग पोलीस ठाणे) अशी कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या लाचखोर पोलिसांना देय वार्षिक वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारण राहणार नाही, अशा रितीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे अशा प्रकारची शिक्षा सुनावली आहे.
 
नायडु हॉस्पिटलच्या गल्लीमध्ये एआयएसएसएमएस महाविद्यालयासमोर दारू पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कारवाई करत असताना एका मोटारीने बॅरीकेटला धडक दिली. तसेच तेथे कर्तव्यास असलेल्या महिला पोलीस हवालदार दीपमाला नायर यांना सुमारे ५० ते ६० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या. या गुन्ह्यातील आरोपी अर्णव सिंघल याला पोलिसांनी ताब्यात घेऊऩ जबाब घेतला.
 
जबाबामध्ये ८ डिसेंबर २०२४ रोजी कोरेगाव पार्क मधील नाकाबंदीच्या ठिकाणी या पोलिसांनी त्यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. तसेच, त्याच दिवशी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोरेगाव पार्क लेन नं. ७ येथे एका पबपासून काही थांबले असताना तेथे एक टोईंग व्हॅनवरील वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगमध्ये गाडी असल्याने १० हजार रुपये भरण्यास सांगून २ हजार ५०० रुपये घेतले. त्यानंतर ९ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री १ वाजता घरी जाण्यासाठी निघाले. त्यावेळी वेलस्ली रोडवर नाकाबंदीचे ठिकाणी संबंधित पोलिसांनी ब्रेथ अ‍ॅनालायाझर चेकिंग केली. त्यामध्ये अल्कोहोल नसल्याचे दिसून आले. तरीही तुम सब दारू पिये हो, असे बोलून सिंघल याच्याकडून पोलिसांनी ५ हजार रुपये घेतले आणि त्याची गाडी सोडली, असे या तरूणाने पोलिसांना सांगितले.
 
एकाच रात्री या पोलिसांनी किमान तिघा वाहनचालकांकडून १२ हजार ५०० रुपयांची वसुली केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी नाकाबंदी करुन किती गाड्या अडवून वाटमारी केली, याचा कोणताही तपशील समोर येऊ शकलेला नाही. संबंधित पोलिसांनी पोलीस दलाची प्रतिमा मलीन करुन शिस्तीचे उल्लंघन करणारे अशोभनीय असे बेशिस्त, बेपर्वा, बेजबाबदारपणा व निष्काळजीपणाचे गैरवर्तन केले आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षकाची बदली करण्यात आली तर इतरांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठविण्यात आले.
 
चौकशीदरम्यान, हे चौघेही दोषी आढळून आल्यामुळे, कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांना देय वार्षिक वेतनवाढ त्यापुढील वेतनवाढीवर परिणाम होणार नाही, अशा रितीने २ वर्ष कालावधीतसाठी का रोखण्यात येऊ नये?, म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. या नोटीसीबाबत त्यांना २५ जून २०२५ रोजी पोलीस आयुक्तांनी बोलावून घेतले होते. त्यांनी सादर केलेला खुलासा व समक्ष केलेले कथन याचे अवलोकन केल्यावर त्यांचा खुलासा अंशत: समाधानकारक आहे, असे मान्य करुन त्यांची वेतनवाढ पुढील वेतनवाढीवर परिणामकारक राहणार नाही, अशा रितीने एक वर्ष कालावधीसाठी रोखण्यात येत आहे, अशी शिक्षा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सुनावली.

Related Articles