रॉयटर्सचे ‘एक्स’ खाते भारतात बंद   

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्सचे अधिकृत ‘एक्स’ खाते भारतात बंद झाले आहे. एका कायदेशीर मागणीच्या प्रतिसादात भारतात हे खाते बंद करण्यात आल्याचे त्यांच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. त्यावर केंद्र सरकारने यासंदर्भात कोणताही नवीन कायदेशीर आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
या घटनेने प्रसारमाध्यम आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तथापि,  रॉयटर्सचे खाते बंद करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. आम्ही एक्ससोबत संपर्कात असून, ही अडचण लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे. 
 
जर सरकारने हे खाते बंद केले नाही, तर ते कोणी केले? ’एक्स’ ने स्वतःहून हे पाऊल उचलले का, की यामागे काही तांत्रिक अडचण आहे? याबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. विशेष म्हणजे रॉयटर्स वृत्तसंस्थेनेही यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.  

मागील आदेश लागू झाला का?

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ७ मे रोजी एक आदेश निघाला होता, परंतु तो कधीही लागू करण्यात आला नव्हता. सध्या एक्सने बहुधा त्याच जुन्या आदेशाची अंमलबजावणी चुकून केली असावी, असे सरकारच्या एका अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे सरकारने एक्सकडे तातडीने स्पष्टीकरण मागवले असून, रॉयटर्सचे खाते पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे.
 

Related Articles