मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे दर ५० टक्क्यांनी वाढवा   

जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस

संयुक्त राष्ट्रे : जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील देशांना साखरयुक्त शीतपेये, मद्य आणि तंबाखूजन्य पदार्थ यावर पुढील १० वर्षांत ५० टक्के करवाढ करावी, अशी शिफारस केली आहे. दीर्घकालीन आजारांना आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक महसूल वाढविण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ३ बाय ३५ या नव्या आरोग्य धोरणाचा हा भाग असून, या उपक्रमाचे पुढील १० वर्षांत १ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स उभारण्याचे महत्त्वाकांक्षी; परंतु साध्य करण्यायोग्य उद्दिष्ट आहे. २०१२ ते २०२२ दरम्यान, जवळजवळ १४० देशांनी तंबाखूवरील कर वाढवले, ज्यामुळे वास्तविक किमती सरासरी ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्या. या शिफारशींमुळे आगामी काळात कोल्ड्रिंक्स, मद्य, तंबाखूजन्य पदार्थ आणखी महाग होऊ शकतात.
 
दरम्यान, ही संभाव्य करवाढ करवाढ ही केवळ आरोग्यसंबंधी उपाययोजना नसून, ती देशांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचाही मार्ग आहे. तथापि, या मार्गात उद्योग क्षेत्राचा विरोध, धोरणाची अंमलबजावणी आणि राजकीय इच्छाशक्ती या सर्वांचा मोठा भाग असेल. जेव्हा आंतरराष्ट्रीय मदत कमी होते आणि सार्वजनिक कर्ज वाढत राहते, अशावेळी या करवाढीचा लाभ होऊ शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधानोम घेबरियेसस यांनी या आरोग्य करांमुळे अनेक देशांना त्यांच्या आरोग्य व्यवस्था बळकट करता येतील, असे म्हटले आहे.
 

Related Articles