जरा हौले हौले चल्लो मोरे साजना...   

धनंजय दीक्षित 

जून महिन्यामध्ये २४,७५५ ते २५,६०१ अशी ८४६ अंकांची घोडदौड केल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निफ्टीने जरा उसंत घेतली असे म्हणता येईल. एकूणच गेला आठवडाभर सौदेबाजांनी जरा सावध पवित्रा घेतल्याचे दिसून आले. साहजिकच आहे... आता २०२५ च्या पहिल्या आर्थिक तिमाहीचे निकाल जाहीर होण्याचा हंगाम सुरु झाला. संगणक क्षेत्रातील दादा कंपनी ’टीसीएस’ व टाटा समूहातील दुसरी नावाजलेली कंपनी ’टाटा एलेक्सई’ या दोन्ही आपले निकाल 10 तारखेला जाहीर करून हंगामाचा (अधिकृतरीत्या) शुभारंभ करतील.
 
गेली जवळजवळ दोन-अडीच वर्षे आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर हे साधारण चेतेश्‍वर पुजाराच्या फलंदाजीप्रमाणे वाटचाल करीत आले आहेत. म्हणजे बर्‍याच तेजीवाल्यांनी केवळ कंटाळून या शेअरमधून आपली गुंतवणूक कमी केलेली आहे. तसे बघितले तर एक संरक्षण क्षेत्रातील कंपन्या आणि काही अंशी बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांचा अपवाद वगळता बहुतेक रथी-महारथींचीही हीच गत झालेली दिसून येते. तीच साधारण परिस्थिती एफएमसीजी कंपन्यांच्या शेअरची सुद्धा आहे; परंतु वर्तुळाचा न्याय हा शेअर बाजारातही लागू होत असल्यामुळे प्रकाशझोतात झळकत असलेल्या कंपन्यांचे शेअर हळूहळू तुलनेने महाग वाटायला लागतात आणि त्यात मुनाफा वसुली होऊन मागे पडलेल्या कंपन्यांकडे सौदेबाजांचे लक्ष जाऊ लागते. 
 
या वर्षी तर आरबीआयने रेपो आणि सीआरआरमध्ये दणक्यात कपात करून आम जनतेच्या हाती पैसे खेळते राहतील अशी सोय केली. त्या आधी 
अंदाजपत्रकामध्ये कर पात्र उत्पन्नाची मर्यादा वाढवून अर्थमंत्र्यांनीही करदात्यांना दिलासा दिलेलाच आहे. दुधात साखर म्हणून पाऊस या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पडण्याचे भाकीत वेधशाळेने केले आहे. या तीनही गोष्टींमुळे विशेष करून ग्रामीण भारतात सुबत्ता येणे सुकर होईल. हे सगळे शुभसंकेत पाहता आणि पी/ई गुणोत्तरानुसार तुलनेने स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे एफएमसीजी शेअरना सुगीचे दिवस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजाराकडे येणार पैशाचा ओघ इतक्यात तरी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. अर्थात वनसाइड तेजी नक्कीच होणार नाही. तात्कालिक कारणांवरून कुठल्याही शेअरमध्ये वेळोवेळी वध घट ही होतच राहणार. शेअरमधील गुंतवणुकीची वाट ही पुणे-बंगळुरू महामार्गाप्रमाणेच खडतर असते. तरीही त्यावरून चालण्याला आत्ता तरी पर्याय नाही. एप्रिल ते जून 2025 या आर्थिक तिमाहीसाठीचे आर्थिक निकाल १ जुलैपासून जाहीर होत आहेत. त्यापैकी काही प्रमुख कंपन्यांच्या निकालांच्या तारखा खालीलप्रमाणे:
 
७ जुलै : सिमेन्स एनर्जी, टेक सोल्युशन, अरिहंत कॅपिटल
८ जुलै :  ५ पैसा कॅपिटल
१० जुलै : टीसीएस, टाटा एलेक्सई, आनंद राठी, एमको एलिकॉन

Related Articles