निगडी ते चिंचवड सेवा रस्त्याची मेट्रोच्या कामामुळे चाळण   

पिंपरी : निगडीतील मधुकर पवळे पूल ते चिंचवड रेल्वे स्थानकापर्यंत सेवा रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. मेट्रोच्या कामामुळे अवजड वाहनांची सतत रस्त्यावर वर्दळ सुरु असते. दिवसभर वाहतूक कोंडी दिसून येत आहे. सकाळी आणि सायंकाळी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक नियंत्रण सिग्नल कालावधी अधिक असल्याने वाहतूक कोंडी आणखी भर पडत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे किरकोळ अपघाताची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे प्रवाशी, वाहनचालक आणि नागरिकांना खड्डे व वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
पिंपरी-चिंचवड व पुण्याला जोडणारा हा मुख्य मार्ग आहे. जूना पुणे-मुंबई या महामार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सकाळी व सायंकाळी तर वाहनांमध्ये आणखीनच भर पडते. मात्र, या मार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. निगडीहून पिंपरीच्या दिशेने येताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यात वाहने आदळतात. वाहनांचा वेग मंदावल्याने वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सेवा रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. या परिसरात अगोदरच रस्ता अरुंद आहे. अशातच परिसरातील खड्ड्यांमुळे आणखीनच वाहतूक कोंडी होते. या मध्ये वाहन चालक अडकून पडतात. या मार्गावर इतर ठिकाणीही खड्डे पडले आहेत.
 
निगडी ते पिंपरी मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोचे खांब उभारण्यासाठी खोदाई केली आहे. यासाठी सुरक्षा कठडे उभारले असून त्याच्या आत हे काम सुरू असते. या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे. बीआरटी मार्गामध्ये जल वाहिनीची खोदाई सुरू आहे. त्यामुळे पीएमपी बस सुद्धा सेवा रस्त्यावरूनच धावत आहेत. सेवा रस्त्याची रुंदी कमी झाल्याने यातून मार्ग काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. निगडी, आकुर्डी, चिंचवड, मोरवाडी या सर्व महत्त्वाच्या चौकांतील सिग्नलचा कालावधी अधिक असल्याने वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागत आहेत. सकाळी आणि सायंकाळच्या वेळी अर्धा किलोमीटर अंतरासाठी चालकांना वीस मिनिटे लागत आहेत.
 
या रस्त्याचा उपयोग दररोज हजारो वाहन चालक करत असतात. पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. सध्या संपूर्ण रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून पावसाच्या पाण्यामुळे हे खड्डे दिसत ही नाहीत. काही चालक खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात चुकीच्या बाजूने जात असतात. त्यामुळे अनेक दुचाकीचालक तोल जाऊन अपघात होत आहेत.
 
दुचाकी अपघाताच्या घटना
 
निगडी ते चिंचवड सेवा रस्त्यावर या खड्यांमुळे अपघाताच्याही घटना घडत आहेत. खड्डे इतके आहेत की, त्यामधून मार्ग काढणेही दुचाकी चालकांना शक्य होत नाही. दरम्यान, खड्ड्यात दुचाकी आदळून दुचाकी चालक अक्षरशः कोलमडून रस्त्यावर पडतात. यामध्ये वाहन चालक जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या रस्त्याने शाळकरी मुले, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यांची मोठी रहदारी असते. सकाळी मुलांना शाळेला सोडायला जाताना खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची भीती वाटते. प्रशासन गांभीर्याने लक्ष देऊन रस्ता खड्डे मुक्त करावा. रस्त्यावर पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे.

Related Articles