वल्लभनगरला अनधिकृत पार्किंगचा विळखा   

पिंपरी : पिंपरी चिंचवड परिसरात महापालिकेच्या वतीने प्रशस्त रस्ते चौक उभारण्यात आले आहेत. तरीसुद्धा शहरांमध्ये पार्किंगची समस्या जैसे थे आहे. वल्लभनगर एसटी स्टँड शेजारी मुख्य रस्त्याच्या कडेने चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे पार्क केली जात आहेत.
 
या बेकायदेशीर पार्किंगमुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेवर ताण आला असून, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. परिणामी रहदारीला आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघातास निमंत्रण मिळत आहे. रस्त्यावरील पार्किंगमुळे रस्ता जाम होत असल्यामुळे त्याचा स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचा वापर एसटी, पीएमपीएमएल बसेस, तसेच खासगी वाहनचालक मोठ्या प्रमाणावर करत असल्यामुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्याच्या कडेने दोन्ही बाजूंना चारचाकी वाहने उभा राहिल्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहनांची कोंडी निर्माण होत आहे.
 
स्थानिक नागरिक, दुकानदार आणि प्रवासी यांच्याकडून वारंवार तक्रारी करण्यात येत असून, प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. महापालिकेने या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. पार्किंगसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून द्यावी आणि बेकायदेशीर पार्किंग करणार्‍या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

Related Articles