सासवडच्या पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी उत्साहात   

सासवड, (वार्ताहर) : पंढरपूर वारीचा साक्षात अनुभव देणार्‍या सासवड येथील पुणे-पंढरपूर पालखी महामार्गालगत कर्‍हा नदीच्या तीरावरील पुरातन विसावा विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पहाटेपासूनच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने मंदिरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
 
या पवित्र दिवशी विठ्ठल-रुक्मिणी पुरंदरे ट्रस्ट यांच्या वतीने पहाटे उत्सव मूर्तींचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर दशरथ लाखे यांच्या अभंगवाणी सादरीकरणाने पंचपदी कार्यक्रमाला सुरुवात झाली. याला पुरंदर कलामंच गायक-गायिका, तबला अलंकार अमोल बेलसरे, तसेच मेघमल्हार संगीत विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्यसंगती दिली.
 
विठ्ठल माझा लेकुरवाळा, नाम घेता अंतरी नाचे बाळा, अशा भक्तिरसात न्हालेल्या अभंगांनी वातावरण भारावून गेले. या वेळी उर्मिला प्रभुणे यांनी ’मनुष्यजन्माचे सार्थक’ या विषयावर विचार मांडले, तर रजनी दीक्षित (अंबरनाथ) यांनी ’भक्ती व नामस्मरणाचे महत्व’ या विषयावर भावनिक विचार मांडले.
 
सायंकाळच्या सत्रात सासवडच्या नामदीप महिला भजनी मंडळ आणि नंतर हनुमान भजनी मंडळ यांनी भक्तिरसात न्हालेले भजन सादर करून उपस्थितांची मने जिंकली. दिवसभर दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी रांगा लावल्या. सासवडकर भाविकांनी एकादशीचा हा पावन सोहळा हरिओम म्हणत, टाळमृदंगाच्या गजरात व भक्तीभावाने उत्स्फूर्तपणे साजरा केला.
 

Related Articles