मार्गासनी - साखर रस्त्याची दूरवस्था   

भोर, (प्रतिनीधी) : वेल्हे तालुक्यातील मार्गासनी-साखर रस्त्याची पावसामुळे चाळण झाली असून ‘रस्त्यावर खड्डे की रस्त्यात खड्डा’ अशी दुर्दशा झाली आहे. १४ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख जिल्हा मार्ग आहे. मात्र,  रस्त्याची दुरवस्था झात्यामुळे या भागातील बारा मावळ व आठरा मावळ खोर्‍यातील नागरिकांना  रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याला वाटेत अनेक गावांचे उपरस्ते मिळतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणांवर विद्यार्थी, चाकरमानी, शेतकरी यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्याने ऐतिहासिक ‘राजगड व तोरणा’ किल्यापर्यंत जाता येते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे गुरूवार, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्यांंच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू आहे. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनचालकांना खड्डे कसे चुकवायचे हाच प्रश्न भेडसावत आहे. अपघाताची शक्यता स्थानिक व पर्यटक व्यक्त करीत आहेत. 
 
शिवसेनेचे ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष उमेश नलावडे यांनी मागील दोन महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम खाते, वनविभाग यांच्याकडे रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, अद्याप त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या भागातील लोकांचे मोठे हाल होत आहेत. दोन दिवसात रस्त्याची दुरूस्ती झाली नाही तर खड्ड्यात ‘वृक्षलागवड करू, रस्ता बंद करू’ असा इशारा नलावडे यांनी प्रशासनाला दिला आहे. 
 
अशीच काहीशी स्थिती नसरापूर ते वेल्हा या मुख्य रस्त्याची काही ठिकाणी झाली आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागत आहे. दरम्यान, थोडा पाऊस कमी होताच खड्डे बुजवण्याचे काम सुरू करणार असल्याची माहिती सार्जनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी दिली.
 

Related Articles