पंढरीत आषाढीनिमित्त २० लाख वैष्णवांचा महासोहळा   

विठू नामाच्या गजराने नगरी दुमदुमली

सोलापूर, (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचा सांस्कृतिक सोहळा, विठ्ठल भक्त वारकर्‍यांची दिवाळी आणि लोकोत्सव आषाढी यात्रा रविवारी अभूतपूर्व गर्दीत मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाली. मागील काही वर्षातील गर्दीचा विक्रम मागे टाकत २० लाखांवर भाविकांच्या साक्षीने एकादशीचा सोहळा पार पडला.  यावेळी विठू नामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली होती. 
 
पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा झाली. तत्पूर्वीच लाखो वैष्णवजनांचा चंद्रभागेच्या वाळवंटात महापूर आलेला होता. राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो दिंड्या आणि वारकर्‍यांनी चंद्रभागा स्नानासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी केली होती. शनिवारी पंढरीत आलेल्या दिंड्या आणि पालख्या सोबतच्या भाविकांनी संपूर्ण शहर गजबजून गेले होते. टाळ मृदंगाचा निनाद आणि राम कृष्ण हरी, माऊली.. माऊली.. ज्ञानबा तुकाराम चा जयघोष यामुळे पंढरीच्या चराचरात हरिभक्तीचा संचार अनुभवास मिळत होता. चंद्रभागा स्नान, नगर प्रदक्षिणा, हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली होती. शहर, उपनगर आणि शेजारच्या गावातील मठ, मंदिर, संस्थाने, ६५  एकर येथील भक्तीसागरातील तंबू राहूट्यामधून भजन कीर्तन व प्रवचनात भाविक दंग झाले होते.  
 
पवित्र चंद्रभागा नदी स्नान, नगर प्रदक्षिणा, नामदेव पायरी तसेच कळसाचे दर्शन घेऊन लाखो वैष्णवांनी आपली आषाढी वारी सावळ्या विठुरायाच्या चरणी रुजू केली. चंद्रभागेला भक्तीचा जणू महापूरच आलेला होता. पहाटेपासूनच वारकर्‍यांनी चंद्रभागेवर स्नानासाठी गर्दी केली होती. नदीचे दोन्ही तिर वारकर्‍यांच्या गर्दीने फुलून गेले होते. वारकरी संप्रदायात दशमी व एकादशीला  चंद्रभागा स्नानाचे विशेष महत्त्व असल्याने अवघा वैष्णव मेळा तीरावर जमला होता. स्नानानंतर पुंडलिकाचे दर्शन घेत वारकरी मंदिराकडे येत होते. चंद्रभागा स्नान, नामदेव पायरी, कळसाचे दर्शन व नगरप्रदक्षिणा ही आषाढी वारीचे परंपरा आहे. संत जगद्गुरु तुकाराम महाराज, संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका स्नानासाठी चंद्रभागेवर गेल्या होत्या. मानकरी, सेवेकरी यांनी पादुकांना चंद्रभागेत स्नान घातले. पालखीने मंदिराचे भोवती नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. माऊलींची पालखी खांद्यावरून नेण्यात आली.
 
आषाढी यात्रेच्या दिवशी श्री विठ्ठलाचा रथ मोठ्या भक्तीमय वातावरणात मिरवणुकीद्वारे काढण्यात येतो. त्यामुळे विठ्ठलाच्या रथ मिरवणुकीमध्ये हजारो भक्त सहभागी झाले होते. विठू नामाच्या जयघोषाने आसमंत म्हणतात दुमदुमून गेला होता.
 

Related Articles